जुलैमध्ये राजकीय भूकंप : खा. राऊत

मध्यावधी निवडणुकांचे संकेत

0
नाशिक | दि. १० प्रतिनिधी- शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी व हमीभाव या शिवसेनेच्या प्रमुख मागण्या आहेत. यासाठी सेनाही शेतकर्‍यांसोबत रस्त्यावर उतरली आहे. राज्य स्थिर राहावे, यासाठी आम्ही अद्याप शासनाचा पाठिंबा काढलेला नाही; परंतु जर भाजपची मध्यावधी निवडणुकांची इच्छा असेल तर शिवसेनेचीही तयारी आहे.
जुलैमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन उभे राहणार असून लग्नघटिका समीप आली, असे म्हणत यावेळीच मोठा भूकंप होईल, असे सूचक वक्तव्य शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केले. राऊत यांच्या विधानात मध्यावधी निवडणुकांचे संकेत असल्याचे मानले जात आहे.

शिवसेनेच्या वतीने राज्यभरात राबवण्यात येत असलेल्या शिवसंपर्क अभियानांतर्गत राऊत हे आज नाशिक जिल्हा दौर्‍यावर होते. सेनेच्या शालिमार येथील कार्यालयात त्यांची पदाधिकार्‍यांशी बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

राऊत म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या हितासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. भविष्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे. त्यांची अंमलबजावणी जुलैमध्ये होणार आहे. ङ्गआता नाही तर कधीच नाहीफ याचे भान ठेवून प्रत्येक शिवसैनिकाने पुढे यायचे आहे. या सर्वाची तयारी म्हणून राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. याद्वारे घरोघर पोहचून सैनिकांनी संपर्क साधायचा आहे. शिवसेनेने आता युद्ध सुरू केले आहे. प्रत्येकाने तयारी करायची आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथे मागील महिन्यात झालेल्या शेतकरी मेळाव्यात आंदोलनाची ठिणगी टाकली आहे. त्याचाच परिणाम म्हणून आजचे शेतकरी आंदोलन राज्यभरात उभे राहिले आहे. शेतकरी आंदोलनात प्रत्येक ठिकाणी शिवसेना कार्यकर्ते सहभागी आहेत. समृद्धी महामार्ग कधीही होऊ देणार नाही हा उद्धव ठाकरे यांचा शेतकर्‍यांसाठी शब्द आहे.

यामुळे समृद्धीमध्ये जमिनी जाणार्‍या शेतकर्‍यांनी काळजी सोडावी. शेतकरी आंदोलनाने मुख्यमंत्री चिंताग्रस्त झाले आहेत. ते कार्यालयाबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. प्रत्येक प्रश्‍न सोडवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून तुमची आहे. यामध्ये आपण कमी पडलात तर त्याचे खापर शिवसेनेवर फोडू नका. अद्याप शिवसेना पुर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरलेली नाही. ज्या दिवशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरतील त्या दिवशी भाजपच्या मंत्री व पदाधिकार्‍यांना घराबाहेर पाऊल ठेवणे मुश्किल होईल, असा इशारा राऊत यांनी दिला.

याप्रसंगी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अजय चौधरी व सुहास सामंत, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, खा. हेमंत गोडसे, आ. राजाभाऊ वाजे व योगेश घोलप, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुहास कांदे व भाऊलाल तांबडे, विलास शिंदे, सुधाकर बडगुजर आदी यावेळी उपस्थित होते. महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी सूत्रंचालन केले.

सुकाणू समितीत फूट पडणे पाप ठरेल
शेतकरी आंदोलनामध्ये शिवसैनिक शेतकर्‍यांबरोबर रस्त्यावर आहे. सुकाणू समिती शेतकर्‍यांनी तयार केली आहे. त्यामध्ये काही घटक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. असे झाल्यास राज्यातील शेतकर्‍यांचे कधीही न भरून येणारे नुकसान होईल. भाजपने आंदोलनात फूट पाडू नये व आंदोलन चिरडू नये. हे मोठे पातक ठरणार आहे. सुकाणू समिती सदस्यांनी एकोपा टिकवावा व फूट पडू नये, यासाठी कटिबद्ध राहावे, असे खा. राऊत म्हणाले.

दिवाकर रावतेंचे बरोबरच
शिवसेना सरकारमध्ये असल्याने काही निर्णयांना बांधील राहावे लागते. सरकारच्या कामापासून आमच्या नेत्यांनी दूर राहू नये. आमची भूमिका ठामपणे रेकॉर्डवर यावी, असा प्रयत्न आहेत. परिवहन मंत्री दिवाकर रावते बरोबर बोलले. वरिष्ठ मंत्रिगट उच्चस्तरीय समिती स्थापन करताना विश्‍वासात घेतले गेले नाही. मुख्यमंत्र्यांनीच समिती तयार करायची असते. रावते त्यामध्ये सहभागी होतील, परंतु या समितीत काय मुद्दे घ्यायचे हे पक्षप्रमुख उद्घव ठाकरे ठरवणार आहेत, अशी माहिती खा. राऊत यांनी दिली.

LEAVE A REPLY

*