Type to search

Featured सार्वमत

‘कारभारी’ ज्योतिषादारी

Share

नगर टाइम्स – अशोक निंबाळकर 

इच्छुक पाहताहेत राजयोग/पदासाठी काळी जादू, नवस-सायास सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका नगरसेवक पदाच्या माध्यमातून समाजसेवा करायला मिळेल की नाही याचा कौल घेण्यासाठी बहुतांश इच्छुकांनी भटजींसमोर कुंडल्या मांडल्या आहेत. काही देवलशांच्या नादी लागले आहेत, तर काहींनी काळ्या जादूसाठी थेट कोलकाता गाठले आहे. सांगली महापालिकेतील काळ्या बाहुलीचा प्रयोग नगरमध्येही केला जात आहे. पदासाठी काही जणांनी नवससायास सुरू केले आहेत. एका बड्या नेत्याने तर साडेसातीमुळे पांढरे कपडे घालायचेच सोडून दिले आहे.

अहमदनगर महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्ष निवडणुकीच्या आखाड्यातील ‘पहिलवानांच्या’ शोधात आहे. काहींना ‘पहिलवान’ अजूनही मिळालेले नाहीत. आरक्षण आणि आगडबंब वार्डामुळं इच्छुकही धास्तावले आहेत. कोणत्या पक्षाच्या चिन्हावर उभे रहायचे. कोणत्या वार्डातून निवडणूक फडात विरोधकाला चितपट करता येईल याचा आदमास घेण्यासाठी राजकीय अभ्यासकाऐवजी भटजींसमोर कुंडली मांडली जात आहे. अनेक इच्छुकांनी नगरबाहेर जात नावाजलेल्या भटजींची भेट घेत ‘भविष्य’ जाणून घेतले आहे. काहीतर देवलशाच्या नादी लागले आहेत. सावेडीतील एका बहाद्दराने तर थेट कोलकात्ता गाठले आहे. तेथील देवलाशी काळ्या जादूसाठी प्रसिध्द आहे. त्या जादूचा वापर नगर महापालिका निवडणुकीचा कौल घेण्यासाठी केला जात आहे. 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम त्यासाठी मोजली जात आहे. एका मोठ्या नेत्याने तर साडेसातीमुळे पांढरे कपडे घालायचेच सोडून दिले आहे.
सांगली महापालिका निवडणुकीत काळ्या जादूचे प्रयोग झाले होते. तेथे प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या दारात काळ्या बाहुल्या टाकल्याचा प्रकार घडला होता. एका उमेदवाराने तर चौकातच काळी बाहुली लटकवली होती. सांगलीतील या काळ्या जादूची चर्चा राज्यभर पसरली होती. नगरमध्येही ती काळी जादू पोहचल्याची माहिती ‘नगर टाइम्स’च्या हाती लागली आहे. महापालिका निवडणुकीला अवकाश असल्याने ती बाहेर आली नाही, मात्र वेळेवर ती बाहेर पडेल असं सांगितलं जात आहे.

महापौरपद मिळेल काय?
निवडणुकीचा अंदाज पूर्वी राजकीय विश्‍लेषक किंवा प्रसिद्धी माध्यमातील तज्ज्ञांकडून घेतला जात असे. मात्र, आता ती स्थिती राहिली नाही. नगरसेवक म्हणून निवडून आलो तर पद कोणते मिळेल. कोणत्या पदासाठी ताकद लावावी याचाही आदमास कुंडलीतून घेतला जात आहे. ‘धनवानांनी’ तर महापौर पद मिळू शकेल काय? अशी थेट विचारणा भटजींसमोर कुंडली मांडून केल्याचे समजते. स्टार कोणाचे स्ट्राँग आहे पतीचे की पत्नीचे हे पाहून भटजींही कारभार्‍याचे भविष्य वर्तवित आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवारास चितपट करण्यासाठी तोटके केले जात आहेत. त्यानुसारच उमेदवार दिला जाणार असल्याचे समजते.

बायकोचे स्टार चांगले
महापालिका निवडणुकीत महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण असल्याने प्रत्येक वार्डात दोन महिलांचे आरक्षण पडले आहे. त्यामुळं निवडणुकीत महिलेला उतरविलं पाहिजे की स्वत:च लढलं पाहिजे याचा कौल कुंडलीतून घेतला जात आहे. एका भटजींचे भविष्य खरं की खोट याचे क्रॉस चेकिंग दुसर्‍यांपुढं कुंडली मांडून केलं जात आहे. भटजींनी सांगितलं तेच खरं मानून अनेकांनी स्वत: थांबण्याचा निर्णय घेत सौभाग्यवतींना पुढं केलं असल्याचे समजते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!