‘तोडपाणी’ भोवले; पोलीस इस्सर बडतर्फ

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – पोलिसांनी पकडलेल्या सव्वा कोटी रुपयांच्या गांज्याचे तोडपाणी पोलीस हवालदार संजय इस्सर यांना चांगलीच महागात पडले. एसपी रंजनकुमार शर्मा यांनी इस्सर यांच्या बडतर्फीचे आदेश मंगळवारी रात्रीच काढले आहेत. शर्मा यांच्या या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
तीन महिन्यांपूर्वी तोफखाना पोलिसांनी भल्या पहाटेच महेश टॉकीज चौकात गांजा तस्करांची टोळी पकडून सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त केला होता. या गुन्ह्यात असलेल्या 12 आरोपींपैकी 9 जणांना पोलिसांनी अटक केली. संजय इस्सर हेही गांजा पकडणार्‍या पोलीस पथकात होते. पकडलेल्या गांजा तस्करांच्या माहिती आधारे तोफखाना पोलिसंानी जुन्या गांजा तस्करांना आरोपी करण्याची भिती दाखवित त्यांच्याकडून पैसे उकळले.
असे जवळपास 90 लाख रुपयांचे तोडपाणी तोफखाना पोलिसांनी केले होते. याची तक्रार थेट नाशिकच्या डीआयजीकडे गेली. त्यानंतर शर्मा यांनी विभागीय चौकशी केली. त्यात तोडपाणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्यासह सात पोलिसांना एसपी शर्मा यांनी सस्पेंड केले. त्यानंतरही इस्सर यांच्यासंदर्भात एसपी शर्मा यांच्याकडे तक्रारी केल्या.
पोलीस खात्याची बदनामी होत असल्याचे शर्मा यांनी इस्सर यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव तयार करून तो आयजीकडे पाठविला. आयजीने त्याला मंजुरी दिल्यानंतर शर्मा यांनी इस्सर यांना मंगळवारी बडतर्फीची नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

*