श्रीगोंद्यात हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा

0

चार महिलांसह सात जण ताब्यात; एका अल्पवयीन तरुणाचा समावेश 

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – शहरातील श्रीगोंदा ते दौंड रोड लगत बायपास रस्त्याजवळ असलेल्या हॉटेल सागर येथे सुरू असलेल्या अवैध कुंटणखान्यावर छापा टाकून पोलिसांनी चार महिला व एका अल्पवयीन तरुणांसह सात पुरुषांना ताब्यात घेतले आहे. ताब्यातील आरोपीवर गुन्हा दाखल केला असून 5 हजार 920 रूपये रोख रक्कम जप्त केली आहे. ही कारवाई श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या पथकाने 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास केली.

शहरातील श्रीगोंदा ते दौंड रोडलगत असलेल्या हॉटेल सागर येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना समजली. त्यांनी पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम यांना पथकासह छापा टाकण्याचे आदेश दिले. या आदेशावरून पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम यांनी 21 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव, पो. कॉ. बोराडे, पो. कॉ. परीट, पो. कॉ. धांडे व महिला पोलीस कर्मचारी यांना सोबत घेऊन हॉटेल सागरवर छापा टाकला.

यावेळी हॉटेल सागर येथे अवैधपणे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. वेश्या व्यवसाय करणार्‍या चार महिलांसह हॉटेल मालक व एका अल्पवयीन तरुणांसह सात पुरुषांना ताब्यात घेतले. यावेळी हॉटेलचे मालक दत्तू दगडू कोथिंबिरे यांच्याकडे पाच हजार 920 रुपये रोख रक्कम आढळून आली.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दत्तू दगडू कोथिंबिरे यांच्यासह गजानन भुजंगराव ठोंबरे (रा. पेडगाव, ता. दौंड), विकी अनिल साळवे (रा. भांडेवाडी), अनिल गोविंद कर्वे (रा. शिरापूर, ता. दौंड), प्रदीप कैलास सांगळे (रा. शिरापूर, ता. दौंड), रमेश रामदास पोकळे (रा. वडगाव, ता. पारनेर) व एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घऊन अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार करीत आहेत.

LEAVE A REPLY

*