पोलीस पाटलांची कचेरीसमोर धरणे

0

मागण्या मान्य न झाल्यास आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील पोलीस पाटलांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी पोलीस पाटलांचे मानधन दहा हजार रुपये महिना करावे, पोलीस पाटलांना वैद्यकीय सेवा लाभ मिळावा, अनुकंपा कायदा पोलीस पाटलांना लागू व्हावा, पेन्शन मिळावी आदी प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकारने मागण्या मान्य न केल्यास 2 ऑगस्टला मुंबईला आझाद मैदानावर उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. आंदोलनाचे नेतृत्व अध्यक्ष मोहनराव शिंगटे यांनी केले.
प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील अधिनियमन 1967 मध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद नसल्याने पोलीस पाटलांच्या मागण्यांची सरकारकडून बोळवण करण्यात येत आहे.
गेल्या 50 वर्षांत सरकारने तुटपुंजी मानधन वाढ केल्याने पोलीस पाटलांना मजुरी करण्याची वेळ आली आहे. सध्या पोलीस पाटलांना अवघे 3 हजार रुपये मानधन मिळत आहे. यात पोलीस पाटलांच्या कुटुंबाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यासाठी सरकारने येत्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील अधिनियमनात दुरूस्ती करण्याची वेळ आली आहे.
पोलीस पाटलांना किमान 10 हजार मानधन मिळावे, 2008 पासून पोलीस पाटील आरोग्य सेवेची सरकारकडे मागणी करत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. यामुळे राज्य सरकारने पोलीस पाटलांना शंभर टक्के आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, कामगारांना अनुकंपा कायदा लागू असताना पोलीस पाटलांना हा कायदा लागू करण्यात आलेला नाही.
यामुळे पोलीस पाटलांना हा कायदा लागू करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी उपाध्यक्ष संजय वाबळे, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब कानवडे, ज्ञानदेव कळमकर, बापूसाहेब परकाळे, निलेश वाघ, विजयसिंग काळे, नंदकिशोर खपके, सीताराम अभाळे, अच्यूत भागवत, विकास भागवत, वसंत वाघमारे, संतोष सांगळे आदींसह जिल्ह्यातील पोलीस पाटील सहभागी झाले होते.
  • नक्षलवादी भागात डोंगर दर्‍यांत काम करणार्‍या पोलीस पाटलांना जबाबदारीने काम करावे लागते. शासनाशी संलग्न असणार्‍या सर्वांना फायदे मिळतात. मात्र, पोलीस पाटील सरकारच्या कल्याणकारी योजनांनापासून वंचित आहेत. सरकारने पोलीस पाटलांच्या मागण्यांचा विचार न केल्यास कायदेशीर मार्गाने हक्क मिळवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. 

LEAVE A REPLY

*