Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

संशयित महिलांची चौकशी करताना पोलिसाच्या श्रीमुखात लगावली

Share

सरकारी कामात अडथळा आणल्याचा एकावर गुन्हा दाखल

नेवासा (का. प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यातील देडगाव येथील यात्रेत चोरीच्या हेतूने संशयित महिला फिरत असल्याचा फोन आल्याने यात्रेत जाऊन सदर महिलांकडे चौकशी करत असताना एका इसमाने पोलिसाच्या श्रीमुखात लगावून सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून बालाजी देडगाव येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल गणेश लक्ष्मण इथापे (वय 20) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता कुकाणा दूरक्षेत्र येथे हजर असताना देडगाव येथील आशिष हिवाळे यांनी मला फोन करुन सांगितले की, बालाजी देडगाव येथील यात्रेत काही महिला चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत आहेत. दूरक्षेत्रावरील अन्य कर्मचारी निवडणूक अनुषंगाने गस्तीसाठी गेलेले असल्याने संशयित महिला पळून जाऊ नये म्हणून साध्या वेशात देडगाव येथे सायंकाळी साडेसातच्या सुमारास गेलो.

आशिष हिवाळे, प्रमोद अंकुश थोरात, लक्ष्मण भीमा सकट असे यात्रेत संशयित महिलांचा शोध घेत फिरत असताना दोन महिला संशयित वाटल्याने आशिष हिवाळे यांचे पत्नीस बरोबर घेवून त्यांचेकडे देडगाव स्टॅण्डजवळ कुकाणा रोडला संशयित महिलांना नाव गाव विचारत असताना तेथे एक इसम आला. मी ज्या संशयित महिलांकडे चौकशी करत होतो त्यांच्या साड्या फेडा मी त्यांना चेक करतो असे तो म्हणू लागल्याने मी त्यास बाजूला करीत असताना त्याने मला गालावर झापड मारुन माझ्याशी झटापट करुन मला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यावेळी माझ्यसोबत असलेल्या वरील इसमांनी धरुन बाजूला केले. त्यावेळी त्यास मी नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव नरहरी भाऊराव मुंगसे रा. देडगाव ता. नेवासा असे असल्याचे सांगितले. सदर इसमाला बाजूला केले. त्यास बाजूला करीत असताना मला मदत करीत असलेल्या वरील लोकांकडून झटापटीत त्याचे तोंडाला लागले. नंतर मी नेवासा पोलीस ठाण्यात फोन करुन मदतीस हवालदार विठ्ठल गायकवाड व पोलीस नाईक राहुल यादव यांना बोलावून घेऊन दोन्ही संशयित महिलांकडे चौकशी केली असता त्या संशयित न वाटल्याने त्यांना सोडून देऊन नरहरी भाऊराव मुंगसे यास ताब्यात घेतले.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी, नरहरी भाऊराव मुंगसे याच्यावर मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्याने भारतीय दंड विधान कलम 353, 332 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करत आहेत.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!