अहमदनगरमध्ये गांजा तस्करी; एक कोटी १४ लाखाचा गांजा जप्त

0

दोन महिलांसह पाचजण अटकेत

अहमदनगर (प्रतिनिधी)– पेट्रोलिंग करत असताना शनिवारी भल्या पहाटे गांजा तस्करी करणारी दोन वाहने नगर-औरंगाबाद रस्त्यावर अकबरनगरजवळ नगर पोलिसांच्या जाळ्यात अडकली. थांबण्याचा इशारा करूनही ही वाहने सुसाट वेगाने पळविण्यात आली. पोलिसांनी पाठलाग करून तस्करी करणार्‍या दोन वाहनांना आशा टॉकीज चौकात पकडून सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त केला असून दोन जीपही ताब्यात घेतल्या आहेत. तस्करी करणार्‍या दोन महिलांसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

संदीप दिलीप अनभुले (रा. घुमरी, कर्जत), सागर भीमाजी कदम (रा. आश्‍वी, संगमनेर), गणेश निवृत्ती लोणारी (रा. जोर्वे, संगमनेर), शोभा कृष्णा कोकाटे (रा. ढमढेरे वाडा, नालेगाव), सीमा राजू पंचारिया (रा. कासारदुमला, संगमनेर) अशी अटक केलेल्या पाच आरोपींची नावे आहेत. गांजा तस्करीसाठी वापरलेली इनोव्हा कार (एम.एच.24,व्ही-1699 आणि बोलेरो (एमएच 17,एजे-6943) ही दोन वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. या दोन जीपमधील 643 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. सव्वा दोन किलो गांजा असलेली पाकिटे करून तयार करून त्यातून ही तस्करी सुरू केली जात होती. विशेष म्हणजे पोलिसांनी पकडलेला गांजा हा सुकलेला आहे.
तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर, हवालदार संजय इस्सर, संजय काळे, धीरज अभंग, भास्कर गायकवाड, योगेश भिंगारदिवे, महिला पोलीस छाया आढाव, चालक हारूण शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांचे हे पथक पहाटेच्यावेळी नगर-औरंगाबाद रस्त्यावर गस्त घालत होते. औरंगाबादच्या दिशेने सुसाट वेगाने जाणारी इनोव्हा कार पोलीस पथकाला दिसली. संशय आल्याने पोलिसांनी हातवारे करून कार थांबविण्याचा इशारा केला, मात्र चालकाने कार न थांबविता सुसाट पळविली. त्यापाठीमागे असलेली बोलेरो जीपही सुसाट वेगाने गेली. पोलीस पथकाने या दोन्ही जीपचा पाठलाग करून आशा टॉकीज त्यांना पकडले. जीपमधील आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी पाकिटांत गांजा असल्याची कबुली दिली. पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहोकले यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अमंली पदार्थाची तस्करी करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्त्रोताची चौकशी सुरू
गांजा व केमिकलची पाकिटे पोलिसांनी तपासणीसाठी पाठविली आहेत. अंमली व मादक पदार्थ असलेला गांजा कोठून आणला, तो कोठे वितरीत केला जाणार होता, याची चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गांजा व केमिकलची पाकिटे पोलिसांनी तपासणीसाठी पाठविली आहेत. अमंली व मादक पदार्थ असलेला गांजा कोठून आणला, तो कोठे वितरीत केला जाणार होता, याची चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

म्होरक्यापर्यंच पोहचण्याचे आव्हान
पकडलेल्या आरोपींमध्ये संगमनेर, कर्जत तालुक्यातील आरोपींचा समावेश आहे. नगरमधील नालेगावातील दोन महिलाही या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. त्यामुळे या रॅकेटची व्याप्ती यापेक्षा मोठी व जिल्हाभर असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. रॅकेटमधील पाच जण पोलिसांच्या ताब्यात सापडले असले तरी रॅकेटचा मुख्य सूत्रधार शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

 

LEAVE A REPLY

*