भोंदू महाराजासह तिघांना पोलीस कोठडी

0

जादुटोणा करून अत्याचाराचा कट रचणार्‍या

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील वाळकी परिसरात राहणार्‍या एका महिलेवर जादुटोणा करून तिच्यावर अत्याचार करण्याचा कट रचण्यात आला होता. या घटनेतील आकाश हरी मोरे (रा. बीड) या भोंदू महाराजासह तिघांना पोलीसांनी अटक करून मंगळवारी (दि.27) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आकाश मोरे, अल्ताप समद शेख (रा. आंबड) व बाळाराम बाबुराव गांगावणे (रा. जुरूगव्हाण, जि. बीड) अशी आरोपींची नावे आहेत.

मंगळवारी या तीन आरोपींना न्यायालयात हजर केले होते. आरोपीने हा प्रकार कसा केला आहे. त्याच्यासोबत आणखी कोणी आरोपी आहेत का, या भोंदूबाबाने यापूर्वी आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, त्याच्याकडे असणारे जादुटोण्याचे साहित्य हस्तगत करणे बाकी आहे. त्यामुळे या तीनही आरोपींना पोलीस कोठडी द्यावी असा युक्तीवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला होता.

न्यायालयाने तीनही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. भोंदूबाबाने एका महिलेला रुद्राक्षाचे मनी देऊन तिच्यावर जादुटोणा केला होता. घरातील सर्व समस्या दूर होतील त्यासाठी रुद्राक्षांच्या मण्यांची नऊ सोमवार पूजा करून दुधाने आंघोळ घालण्यास सांगितले होते. मात्र, महाराजांनी महिलेला जादुटोण्याची भीती दाखवून तिच्याशी अश्लिल भाषेत बोलला होता. दरम्यान महाराजाने या महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत नवर्‍याला 24 तासांत ठार मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान, महिलेने हा प्रकार पतीस सांगितला. भोंदू महाराजाचा हा प्रताप पोलीस ठाण्यात कथन केला असता कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी भोंदू महाराजासह तिघांना अटक केली.

आमिषाला बळी पडू नये
जर अशा पद्धतीने कोणी आपली फसवणूक करीत असेल तर नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा. महिलेच्या प्रसंगावधानामुळे अशा प्रकारच्या भोंदू बाबांचे पितळ उघडे पडते. त्यामुळे कशाचे आमिष दाखवून फसवणूक होत असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा..
– अभय परमार, पोलीस निरीक्षक

LEAVE A REPLY

*