इगतपुरी तालुक्यातील धारगावचा रस्ता गेला चोरीला

श्रमजीवी संघटनेची पोलिसांत तक्रार

0

कावनई ता.25 वार्ताहर : इगतपुरी तालुक्यातील धारगाव येथील एक रस्ताच चक्क चोरीला गेल्याची तक्रार श्रमजीवी संघटनेने घोटी पोलीस स्टेशनला दिली आहे.

त्यामुळे आता हा रस्ता शोधण्याचे वेगळेच आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील धारगाव जवळील खडाडवाडी या वस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता मंजूर केला होता.

या रस्त्याचे काम पूर्ण झाले असल्याचा दावाही बांधकाम विभागाने केला आहे. ही बाब श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास स्थानिक नागरिकांनी आणून दिली.

यानुसार श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केली असता, या वाडीला जोडणारा रस्ताच झाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली.

त्यानंतर त्यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता सदर रस्त्याचे काम पूर्ण झाले असल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले.

दरम्यान जर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम केले असेल तरीही रस्ताच अस्तित्वात नसेल, तर त्याची चोरी झाली असावी आणि हा चोरी गेलेला रस्ता शोधून द्यावा यासाठी श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

LEAVE A REPLY

*