पोलिसांना ‘प्रॉपर्टी एक्स्पो’त आवडीचे घर मिळणे शक्य : सिंगल

0
नाशिक | दि. ३ प्रतिनिधी –पोलीस सेवेत कार्यरत असताना पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना मनासारखे तसेच हक्काचे घर मिळणे सोपे जात नाही, यामुळे सेवानिवृत्तीनंतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

स्वत:चे घर वेळीच मिळाले तर उतारवयात अडचणी राहणार नाही म्हणून नाशिक परीक्षेत्रातील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्रॉपर्टी एक्स्पोच्यामार्फत आवडीचे घर शोधावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले.

पोलिसांना हक्काचे घर घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस मुख्यालयातील बराक क्रमांक १७ मध्ये प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासन आणि क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल आणि महिला व बालकल्याण विभागाच्या सचिव विनीता सिंगल यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल, एचडीएफसी बँकेचे संदीप कुलकर्णी, उमेश वानखेडे, नरेंद्र ठक्कर, अनिल आहेर, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे आदी मान्यवर उपस्थित होते.

दोन दिवस चालणार्‍या या प्रदर्शनाचा पोलिसांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सुनील कोतवाल यांनी केले. तसेच यानंतर होणार्‍या शेल्टरच्या प्रदर्शनांमध्ये पोलिसांना घर घेण्याची संधी दिली जाईल, असेही सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी केले तर उपायुक्त माधुरी कांगणे यांनी आभार मानले. या प्रदर्शनात १५ बांधकाम व्यावसायिकांनी सहभाग घेतला असून त्यांच्याकडील फ्लॅटचे प्रदर्शन आहे.

LEAVE A REPLY

*