Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

विषारी गवताचे जिल्ह्यात 37 बळी

Share

पशुसंवर्धन विभागाने वाचविले 100 जनावरांचे प्राण

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात नायट्रेट जास्त असलेले गवत व काही वनस्पती खाण्यात गेल्याने आत्तापर्यंत 37 जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. जनावरांच्या शरिरात नायट्रेट पॉइझनिंग होऊन ही जनावरे दगावली असल्याचे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. संगमनेर, नेवासे, पाथर्डी, नगर आणि पारनेर तालुक्यातील जनावरांचा यात समावेश आहे. पशुसंवर्धन विभागाने वेळीच उपचार केल्याने या प्रकारातून 100 जनावरे वाचली आहेत. शेतकर्‍यांनी नायट्रेट अधिक असणारे गवत जनावरांना देऊ नये, असे सांगण्यात आले आहे.

पावसाळ्यात ठिकठिकाणी कोवळे गवत उगवते. या गवतात नायट्रेटचे प्रमाण जास्त असते. शेतकरी जनावरांना हे गवत उपटून खायला देतात. या गवताच्या मुळ्या व खोडात नायट्रेटचे प्रमाण अधिक असते. नायट्रेटमुळे विषबाधा होऊन जनावरे दगावत असल्याचा अंदाज पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला. पशुपालक शेतकर्‍यांनी जनावरांना हिरव्या गवतासोबत कोरडा चारा किंवा अन्य चार्‍याचे मिश्रण करून द्यावे तसेच गवताच्या मुळ्या व खोड खाण्यास देऊ नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

नगर तालुक्यातील वडगाव तांदळी, राळेगण, आंबिलवाडी येथील आठ जनावरे, पाथर्डी तालुक्यातील चारा छावणीतील एक जनावर, नेवासे तालुक्यातील कुकाणा येथील सात जनावरे, राहाता तालुक्यातील अस्तगाव येथील एक जनावर, संगमनेर तालुक्यातील नऊ जनावरे, पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिद, बांबुर्डी येथील तीन अशी आत्तापर्यंत एकूण 37 जनावरे विषारी अंश असलेले गवत खाल्ल्याने दगावल्याचे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातूनच सांगण्यात आले. वेळेवर उपचार मिळाल्याने जवळपास 100 जनावरे बचावली असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

ही आहेत लक्षणे
लाळ गळते, स्नायूंमध्ये कंप होणे, पोट दुखते, जुलाब होणे, अशक्तपणा येणे, तोंड व डोळ्यांची आंतरत्वचा चॉकलेटी किंवा निळी पडणे, तोंडाने श्वास घेणे, रक्त चॉकलेटी दिसणे, जनावरे कोमात जाऊन मृत्यू होतो. सुरुवातीची लक्षणे न दिसता अचानक ओरडून जमिनीवर आडवे पडूनही जनावरे मृत्यू पावतात, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सुनील तुंबारे यांनी दिली.

पावसामुळे गवतावर बाष्पाचे प्रमाण वाढून त्यामुळे त्यात नायट्रेटचे प्रमाणही वाढते. ते पोटात गेल्याने रक्तात जलद गतीने शोषले जाते. ऑक्सिजन वाहून नेण्याची रक्ताची क्षमता त्यामुळे कमी होते. परिणामी हृदय व फुप्फुसे निकामी होऊन मृत्यू होतो. नायट्रेटचे प्रमाण हे गवताच्या मुळ्या व खोडात जास्त असते. पानात हे प्रमाण कमी असते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!