विभागीय मराठी साहित्य संमेलन : काव्य संध्या, ग्रंथदिंडीने संमेलनात रंगत

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – बँड पथकाची सुरेल सुरावट, सनईचा मंजूळ ध्वनी, पारंपरिक पोशाखात निघालेली ग्रंथदिंडी, संमेलन स्थळावर रेखाटलेली सुबक रंगोळी, साहित्यिकांचे मन लुब्ध करीत होती. या उत्सवी वातावरणात विभागीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले.
वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांची तिरकस भाषा, संमेलनाध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे यांच्या परखड विचारांनी संमेलनाचा पहिला दिवस गाजला. त्यांनी साहित्यासोबतच देशाच्या सामाजिक आणि राजकीय स्थितीची चिरफाड केली. स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, संयोजक जयंत येलूलकर यांनी केलेले नेटके आणि आकर्षक आयोजन सारस्वतांची वाहवा मिळून गेले. या संमेलनास तब्बल सोळा जिल्ह्यांतून साहित्यिक आले आहेत. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात हा साहित्यिकांचा मेळा भरला आहे.
शनिवारी सकाळी आकर्षक ग्रंथदिंडी निघाली. महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर ती संमेलनस्थळी पोचली. या ग्रंथदिंडीत भाऊसाहेब फिरोदिया शाळा, न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे एनएसएसचे पथक, पेमराज गुगळे विद्यालय, रुपीबाई बोरा विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. ग्रंथदिंडीच्या उद्घाटनावेळी संमेलनाध्यक्ष रंगनाथ पठारे, नरेंद्र फिरोदिया, जयंत येलूलकर आदी उपस्थित होते.
दिंडीतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, तुकाराम महाराज यांची वेशभूषा परिधान केल्याने ही ग्रंथदिंडी आकर्षक ठरली. संमेलनस्थळी आल्यानंतर ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सोलापूर, बीड, औरंगाबाद, नाशिक, पुणे, नगर आदी जिल्ह्यांतील प्रकाशकांनी प्रदर्शनात स्टॉल लावले आहेत. या पुस्तकांवर 10 टक्क्यांपासून 50 टक्यांपर्यंत सवलत आहे.
संमेलनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील कवींचे काव्य संमेलनात रंगले. या संमेलनात सोलापूर, पुणे, बीड, औरंगाबाद, नगर, रत्नागिरी, मुंबई, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातील कवी सहभागी झाले होते. ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांच्या अध्यक्षतेखाली हा काव्यमेळा झाला. शर्मिला गोसावी व संदीप काळे यांनी संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन केले.
संमेलन उद्घाटनापूर्वी नंदिनी व अंजली गायकवाड यांनी गायन केले. प्रा. गणेश भगत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संग्राहक शब्बीर शेख, नवनाथ वाव्हळ, डॉ. लीला गोविलकर, सुमती लांडे, भूषण देशमुख, अनिरुद्ध देवचक्के यांचा सत्कार करण्यात आला.

दोन परप्रांतीयांचे मराठी प्रेम : नगरमधील साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व संयोजक जयंत येलूलकर हे दोघेही परप्रांतीय आहेत. फिरोदिया हे मूळचे राजस्थानातील आणि येलूलकर आंध्रप्रदेशचे. मात्र, फिरोदियांच्या चार पिढ्यांनी नगरचा सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय परीघ मोठा करण्यासाठी प्रयत्न केले. तोच वारसा नरेंद्र फिरोदिया जोपासत आहेत. येलूलकर यांचे हे गेल्या 25 वर्षांपासून नगरच्या कला, सांस्कृतिक क्षेत्रांत कार्यरत आहेत. आता साहित्य क्षेत्रातही त्यांची एंट्री झाली आहे. त्यांचा पाडवा कार्यक्रम नगरकरांसाठी सांस्कृतिक पर्वणी असतो. पर्यटनाबाबतही ते सतत जनजागृती करीत असतात. सावेडी शाखेच्या माध्यमातून त्यांनी साहित्यासाठी अनेक उपक्रम केले आहेत. एकाची मातृभाषा राजस्थानी तर दुसर्‍याची तमीळ आहे. मात्र, त्यांनी नगरमध्ये मराठी साहित्यिकांचा मेळा जमवून मराठी प्रेमाची पावती दिली आहे. ते खर्‍या अर्थाने नगरी झाले आहेत.

आज रविवारी संमेलनात सकाळी 9ः30 वाजता ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांची सुधीर गाडगीळ प्रकट मुलाखत घेणार आहेत. 10ः30 वाजता कवी संमेलन, 12ः30 वाजता आमची मराठी, आमची भूमिका या विषयावर परिसंवाद. सहभाग नीलम गोर्‍हे, माधव भंडारी, भालचंद्र कांगो, आ. भाई जगताप. दुपारी 2ः30 वाजता दिशा शेख यांची नीलिमा बंडेलू प्रकट मुलाखत घेतील. दुपारी 4 वाजता माईक एकांकिका सादर होईल. सायंकायी 5ः30 वाजता समारोप होणार आहे. 

LEAVE A REPLY

*