कवी अनंत फंदी व्याख्यानमाला : भूतकाळातील आठवणी व भविष्यातील चिंता सोडल्यास जीवन आनंदी होईल

0
संगमनेर-कवी अनंत फंदी व्याख्यानमालेत बोलताना व्याख्याते मंदार भारदे. (छाया-किरण डोंगरे)

मंदार भारदे,  पुष्प-4

संगमनेर (प्रतिनिधी)-संपूर्ण जीवन आपण टाचा घासत असतो, भूत मागे लागल्यासारखे पळतो, त्यामुळे आपण मौल्यवान जीवनातील आनंद गमावून बसलो आहे, जर आनंदी जीवन जगायचे असेल तर जे तुमच्या हातात आहे त्याचा विचार करा, त्यातून तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल, आणि तुमचं जीवन आनंददायी होईल, जगणं सुंदर आहे, भूतकाळातील आठवणी व भविष्यातील चिंता सोडल्यास जीवन आनंदी होईल, असे प्रतिपादन व्याख्याते मंदार भारदे यांनी केले.
कवी अनंत फंदी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केलेल्या कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे चौथे पुष्प ‘माझं आणि माझ्या बोक्याचे ब्लडप्रेशर’ या विषयावर गुंफतांना श्री. भारदे बोलत होते. अध्यक्षस्थानी शारदा पतसंस्थेचे उपाध्यक्ष कैलास राठी होते. व्यासपीठावर नारायण कलंत्री, अनिल राठी उपस्थित होते.
मंदार भारदे म्हणाले, जनावरांना तणाव नसतो, ते लक्झरी जीवन जगतात. आपण का जगू शकत नाही? असा प्रश्‍न पडला. घरातील बोक्याला कसलं टेन्शन नाही, मात्र मला त्याच्या जेवणाचं टेन्शन. मग तो सुखी की आपण? या प्रश्‍नानं डोक्यात काहूर केलं. तेव्हा ठरविलं की आनंदी जीवन जगायचं, ब्लडप्रेशरला बळी पडायचं नाही, आनंदी जीवन जगण्यातच करीअर करायचं. हा स्वअनुभव सांगत ते म्हणाले, तणावाचे आयुष्य जगणार नाही हे प्रत्येकानं ठरविलं पाहिजे, तणावातून बाहेर पडलं पाहिजे.
जीवनात सर्व गोष्टीचं टेन्शन येतं, पण हातातून निघून जाणार्‍या दिवसाचं टेन्शन येत नाही, कुणाला काय वाटेल, यापेक्षा आपणाला काय वाटते याला महत्व द्या, आनंदी जीवनाच्या महोत्सवात तुमचा प्रवेश नक्की होईल, ताण-तणावाच्या दुनियेत हरविलेली मंडळी जगण्याच्या शक्यता गमावून बसल्या आहेत. चेहर्‍यावरील हास्य गमावले आहे. लहान बालकाच्या निरागस चेहर्‍यावरील हास्य हे ते बाळ साठ वर्षाचे झाल्यावर त्याच्या चेहर्‍यावर दिसत नाही, याचं कारण म्हणजे त्यानं जगलेली ‘लाईफस्टाईल’ होय. आणि याच ‘लाईफस्टाईल’ ने त्याच्या पायाखालची वाळू कधी सरकून गेली हे त्यालाही कळलं नाही.
त्यामुळे त्याला आनंदी जीवनाचा स्पर्शही झाला नाही. धकाधकीच्या जीवनात मनुष्य रंग, चव, आनंद, विसरला. त्याच्या ‘इण्डेक्स’मध्ये नेहमी द्वेष, ईषा यांनी स्थान घेतलं. त्यामुळं माणसं जगणं विसरली. त्यामुळं त्यांनी स्वतः जगण्याच्या आयुष्यावर सुतक ओढून घेतलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. ती नाकारता येणार नाही. तेव्हा आनंदी जीवन जगायचं असेल तर स्वतः एकदा आरसात बघा, आणि चेहर्‍यावर हास्य आणा, चेहर्‍यावर एकही आढी पडली नाही तर तुम्ही आनंदी आणि आढी पडली तर तुम्ही दुःखी असं समजा.
मग तुम्ही स्वतःच ठरवाल की जीवन कसं जगायचं नदीतील खळखळ वाहणार्‍या पाण्यासारखं जीवन जगण्याचा प्राधान्य द्या, आपल्या उत्पन्नापेक्षा आनंदी जीवनाला महत्वा द्या, कारण भूतान या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाला महत्व नसून देशातील नागरीकांच्या आनंदाला महत्व आहे. पश्‍चात्य देशातील लोकांचे चेहरे नेहमी टवटवीत असतात, कारण ते भविष्याची चिंता करत नाही, आणि भारतातील लोक भूतकाळातील आठवणी व भविष्यकाळातील चिंता यामध्ये चिंतेत असतात, म्हणून त्यांच्या चेहर्‍यावर कधीही हास्य पहायला मिळत नाही, असा खेदही भारदे यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन राजेश मालपाणी यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले. व्याख्यानमालेस मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*