कवी अनंत फंदी व्याख्यानमाला : शेतकरी कर्जबाजारी होणार नाही अशी व्यवस्था निर्माण होण्याची गरज

0
संगमनेर (प्रतिनिधी)-शेतीच्या मालाला भाव पाहिजे, शेतकर्‍याला पाणी पाहिजे, अशी व्यवस्था निर्माण होणं गरजेचं आहे. खरं तर समाजानंच शेतकर्‍यावर विश्‍वास टाकला पाहिजे, कोण काय देईल यापेक्षा आपण काय देऊ शकू याला महत्त्व दिलं तर शेतकरी आत्महत्या करणार नाही, कर्जमाफीच्या आशेवर बसण्यापेक्षा शेतकरी कर्जबाजारी होणार नाही अशी व्यवस्था निर्माण होणं गरजेचं आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री निलिमा मिश्रा यांनी केले.
कवी अनंत फंदी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केलेल्या कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ‘ग्रामविकासातला प्रवास’ या विषयावर गुंफताना मिश्रा बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात होते. व्यासपीठावर नारायण कलंत्री, अनिल राठी उपस्थित होते.
निलिमा मिश्रा म्हणाल्या, ग्रामीण भागातील समस्या जाणून घेताना प्रत्येकाच्या मनातील संवेदना कळल्या. त्यानुसार कामाची रचना केली. सलग तीन वर्षे दुष्काळात जळगाव जिल्हा होता. शेतकरी आत्महत्या करत होता. महिलांच्या समस्या होत्या. ही परिस्थिती डोळ्यासमोर असताना काय करता येईल? हा प्रश्‍न सारखा टोचत होता. जेव्हा या लोकांच्या संवेदना जाणून घेतल्या, तेव्हाच ठरवलं आता याच लोकांसाठी काम करायचं. डॉ. कलबाग यांच्या मार्गदर्शनाखाली भारतभर दौरा केला.
समस्या जाणून घेतल्या, विविध संस्थांना भेटी दिल्या. तेव्हा कुठे दिशा निश्‍चित झाली, आणि गावपातळीवर कामाला सुरुवात केली. सुरुवातीला महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू झाला. बचत गट निर्माण केले. महिलांच्या हाताला काम मिळालं, त्यामुळं त्यांचा आर्थिक प्रश्‍न मिटला. सुरुवातीला 14 महिलांनी साथ दिली. त्यानंतर शेकडो महिला पुढे आल्या. मजबूर आणि लाचारी येणार नाही यासाठी काय करता येईल तर यासाठी बचत गटाची प्रक्रिया सुरू केली.
27 वर्षांचा प्लॅन केला. गावातील तरुण-तरुणी एकत्र आल्या, 33 पदार्थ या महिलांनी बनविले. मात्र त्याला मार्केट कसं मिळणार हा प्रश्‍न होता. मग त्या मालाचं प्रदर्शन भरवणं सुरू केलं. व्यवहारात नातं नसतं हे महिलांना कळलं. त्या पुढे आल्या. 14 महिलांंनी 100 महिलांना संगणकाचं शिक्षण दिलं. कर्म करत गेलो की संधी मिळते, फक्त संधी ओळखता आली पाहिजे. बचत गटाला जर्मनीहून गोधड्या बनविण्याचं काम मिळालं. आज 1700 महिलांना गोधड्यांमुळं रोजगार उपलब्ध झाला आहे.
विविध समस्या सोडवत असताना शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा प्रश्‍न उभा होता. काय करता येईल? पुन्हा प्रश्‍न टोचत राहिला. त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. शेतकर्‍यालाच विचारलं, तर शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे असं त्याचं उत्तर आलं. आता हे काही शक्य नव्हतं. मात्र शेतकर्‍याला भांडवल देता येईल का? यावर विचार केला. भांडवल देताना काही बंधने घालून देण्याचा विचार केला.
महिलांचे हिमोग्लोबीन योग्य आहे का?, त्यांना शौचालय आहे का? असेल तरच भांडवल मिळेल. हे शेतकर्‍यांना पटलं. हळूहळू शेतकर्‍याला शेतीसाठी लागणारं साहित्य मिळू लागलं, तसे शेतकर्‍याचे उत्पन्न वाढले. ही व्यवस्था निर्माण केली गेली तेव्हा कुठे बहादरपूरसह इतर चार-पाच गावांमध्ये शेतकर्‍याच्या आत्महत्या थांबल्या. हे सर्व करत असताना अडचणी आल्या. मात्र काम करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवली. त्यामुळं शक्य झालं.
आजही शेतकर्‍याच्या मालाला बाजारभाव मिळत नाही, त्याला पाणी मिळत नाही, यासाठी सक्षम व्यवस्था असावी, मात्र ती नाही. चार-पाच गावांतील शेतकर्‍यांसाठी व्यवस्था होण्याऐवजी सर्व शेतकर्‍यांसाठी अशी व्यवस्था निर्माण होणं गरजेचं असल्याचेही मिश्रा म्हणाल्या.
आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, आजच्या मोबाईल जमान्यात व्याख्यानमालेनं आपलं स्थान टिकून ठेवलं असल्याचे सांगत ग्रामविकासाच्यादृष्टीने बचत गटांची संकल्पना राबवत असताना ब्रॅण्ड निर्माण होणं महत्त्वाचं आहे. बचत गटांनी कुठलीही वस्तू बनविली तर ती ब्रॅण्डमुळं ओळखली गेली पाहिजे. काहीतरी नवीन बनविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. जो बॅ्रण्ड तुमची ओळख होईल.
सूत्रसंचालन अरुण ताजणे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. व्याख्यानमालेस मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.
आजचे व्याख्यान –
डॉ. विवेक सावंत-भारतीयांची ज्ञानयुगात झेप-संधी व आव्हाने

LEAVE A REPLY

*