कवी अनंत फंदी व्याख्यानमाला : कलावंत सांस्कृतिक आरोग्य जपण्याचं कार्य करतात : दिग्दर्शक मिलींद शिंदे

0
पुष्प-1
संगमनेर (प्रतिनिधी) – अभिनय शिकावा लागतो, ते जाणून घेण्याची जिज्ञासा हवी लागते. मिळालेलं शिक्षण तुम्हाला जीवंत ठेवतं. कुठलंही क्षेत्र निवडा, पण त्याचं शिक्षण घ्या, त्याचा सराव ठेवा, मिळालेलं शिक्षण वाया जात नाही आणि या शिक्षणातूनच कलावंत घडतात. हेच कलावंत सांस्कृतिक आरोग्य जपण्याचं कार्य करतात, असे प्रतिपादन दिग्दर्शक, अभिनेता मिलिंद शिंदे यांनी केले.
कवी अनंत फंदी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केलेल्या कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे 40 वर्षांतील पहिले पुष्प ‘नाट्य-चित्रपट प्रशिक्षण आणि आपण’ या विषयावर गुंफतांना अभिनेते मिलिंद शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी सर्वोदय पतसंस्थेचे अध्यक्ष शैलेश ओहरा होते. व्यासपीठावर नारायण कलंत्री, अनिल राठी उपस्थित होते.
मिलिंद शिंदे म्हणाले, नाटक, चित्रपट, मालिका यामधील भूमिका साकारताना जीव ओतून काम करावं लागतं. अभिनयाचं प्रशिक्षण दिल्ली व पुणे इथं घेतलं. तरी देखील कुठेही काम मिळेना, आपलं क्षेत्र चुकलं की काय? असंही वाटलं. मात्र शिक्षण कधी वाया जात नाही, शिक्षण समजून घेतलं पाहिजे. त्याचा सराव केला पाहिजे. चांगलं दिसण्यापेक्षा अभिनयाची कला तुमच्यात असणं महत्त्वाचं आहे.
काही लोकांना ती उपजतच असते. शिक्षण कधी संपत नाही. शिक्षणाचा रवंथ करणं गरजेचं आहे. ती सतत शिकण्याची प्रक्रिया आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचं शिक्षण घेत असताना स्वतःचा शोध घेण्याचं तिथं शिकवलं जातं. त्यातूनच अभिनेता घडतो. अभिनेते ओम पुरी यांच्यामुळे धाडस मिळालं. यशराज जाधव यांच्यामुळे प्रेरणा मिळाली. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधील शिक्षण, एसटीआयआय, एनएसडी, पुणे येथील शिक्षणाची शिदोरी जवळ होती.
स्वतःच सिंहावलोकन केलं. ईटीव्हीत मिळालेली नोकरी आणि त्यानंतर ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ या नाटकानं राष्ट्रीय स्तरावर पोहचवलं. अभिनय करता करता पुस्तकांची साथही महत्त्वाची ठरली. मुंबईला जेंव्हा गेलो, तेंव्हा पुन्हा परत नगरला यायचं नाही, असं ठरवलं होतं. पडतीच्या काळात चांगली माणसं मिळाली, त्यापैकी आमदार बाळासाहेब थोरात एक होते. ज्यांच्याकडे राहुल राजळे मला घेऊन गेले. अशी न विसणारी माणसं मिळाली आणि कला क्षेत्रात पुढे सरकत राहिलो. अजूनही कलाक्षेत्रातील प्रवास सुरूच आहे.
अभिनयाची व्याख्या करताना त्यांनी ढोंग, सोंग, नक्कल अशीही केली. आवडता अभिनेता अभिताभ बच्चन, नसरुद्दीन शाह, अभिनेत्री शबाना आझमी, स्मिता पाटील, काजल असल्याचं सांगत त्यांनी ‘तांबडेबाबा’ या भूमिकेतील कविताही सादर केली. चित्रपट आणि मालिका हे साम्य आहे, कारण अभिनयावेळी कॅमेरा समोर असतो. मात्र नाटकाचं तसं नसतं. नाटक जीवंत अभिनय आहे. नाटक माझा सराव असल्याचेही शिंदे म्हणाले.
प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख डॉ. अनिल राठी यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. ओंकार बिहाणी यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. व्याख्यानमालेस मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*