पुणे : पंतप्रधान मोदींनी फोनवरून साधला नायडू रुग्णालयातील नर्सशी संवाद

jalgaon-digital
2 Min Read

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – हॅलो छाया सिस्टर, नमस्ते तुम्ही कशा आहात? तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना? असा मराठीत प्रश्न विचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील नायडू रुग्णालयातील सिस्टर छाया जगताप यांची व त्यांच्या सहकार्यांची विचारपूस केली. पंतप्रधान मोदींचा हा फोन, सर्व धोके पत्करून कोरोना बाधित रुग्णाची सेवा करणारे नायडू रुग्णालयातील डॉक्टर, सिस्टर्स आणि सर्व कर्मचार्‍यांचे मनोधैर्य वाढविणारा ठरला.
नायडू रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत. या रुग्णालयातील नर्स छाया यांच्याशी पंतप्रधानांनी दूरध्वनीवरुन संवाद साधला आणि त्यांच्या कामाचे कौतुकही केले.

यावेळी त्यांनी रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, इतर कर्मचारी वर्गाची माहिती घेत रुग्णालयातील नर्सेसची विचारपूस करत त्यांना त्यांना धीर दिला. मराठीत सुरुवात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छाया सिस्टर यांच्याशी संवाद साधला. तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना, कोरोनाचे पेशंट हाताळताना तुमच्या नेमक्या काय भावना असतात, तुम्ही हे काम करीत असल्याने तुमचे कुटुंबीय चिंतेत तर नाहीत ना, नीट काळजी घ्या आपण सर्वजण मिळून कोरोनाला देशातून घालूयात, अशा शब्दांत पंतप्रधानांनी हॉस्पिटलमधील सर्व कर्मचार्‍यांची विचारपूस केली.

तसेच तुम्ही एवढ्या जोखमीच्या ठिकाणी काम करत आहात मग तुमच्या परिवाराला तुमच्याविषयी काळजी वाटत असेल ना. याशिवाय जेव्हा रुग्णालयात पेशंट येतात तेव्हा ते घाबरलेले असतात का? त्यांच्याशी तुम्ही कसा संवाद साधता, पेशंटला कसा धीर देता त्यांच्यातील भीती कशी घालवता आणि तुम्ही आपल्या स्वतःच्या परिवाराला ही कसे आश्वस्त करता, अशी चौकशी त्यांनी केली. तर, पेशंटची भीती घालवण्यासाठी नर्सेस काय करतात याची माहिती छाया यांनी पंतप्रधानांना दिली. देशभरात हजारो नर्सेस या रोगाचा सामना करण्यासाठी काम करत आहेत, त्या सर्वांना शुभेच्छा देत मोदी यांनी त्यांचे आभार ही मानले. सिस्टर छाया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, आमच्या घरच्यांना आमच्याविषयी खरोखरीच चिंता असते. पण आम्ही पूर्ण काळजी घेऊन काम करत असतो. कुठल्याही पद्धतीने संसर्ग होणार नाही याची दक्षता घेतो. नायडू हॉस्पिटल मध्ये सात रुग्ण बरे होऊन गेले आहेत, तर सध्या नऊ रुग्ण उपचार घेत आहेत, त्या सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनाही लवकरच डिस्चार्ज मिळेल असेही त्या म्हणाल्या. हॉस्पिटलच्या वतीने इथला सर्व कर्मचारी वर्ग डॉक्टर्स आणि नर्सेस यांची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे असेही त्यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *