कॅरीबॅग विक्री करणार्‍यांविरुध्द कारवाई

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर नगरपालिकेने काल शहरात कॅरीबॅग विक्री करणार्‍या व्यावसायीकांविरूध्द दंडात्मक कारवाई केली.
मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका कर्मचार्‍यांनी काल सकाळी 11 वाजता मेनरोडवरील श्रीचंद जनरल स्टोअर्स दुकानातून 135 किलो कॅरीबॅग, स्टेट बँक चौकतील महावीर प्लॅस्टीक अ‍ॅन्ड जनरल या दुकानातून 230 किलो कॅरीबॅग एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॅरीबॅग जप्त केल्या तसेच त्यांच्यावर प्रत्येकी 5000 हजार रुपयाप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली.
ही प्लॅस्टीक विरोधी मोहीम राबविल्याने व्यावसायीकांत खळबळ उडाली आहे. श्रीरामपूर नगरपालिकेने स्वच्छ शहर स्पर्धेत भाग घेतला असून शहराच्या स्वच्छतेच्यादृष्टीने तसेच पर्यावरणास घातक ठरत असलेल्या प्लॅस्टीक कॅरीबॅग विक्री व वापर पूर्णपणे थांबविण्यासाठी नगरपालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत.
तरी शहरातील व्यावसायीकांनी 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टीकच्या पिशव्यांची विक्री करू नये. जर अशा प्रकारे कॅरीबॅग विक्री करताना कोणीही आढळून आल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा नियंत्रण अध्यादेश 2006 नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी दिला आहे.
नगरपरिषदेने प्लॅस्टीक विरोधी केलेली कारवाई कौतुकास्पद असून मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांचे अभिनंदन मात्र एवढ्यावरच न थांबता श्रीरामपूर शहर 100 टक्के प्लॅस्टीकमुक्त करावे असे मत नरेंद्रसिंग होडे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

*