Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

संगमनेरात गावठी कट्टा व 38 जिवंत काडतुसे जप्त

Share

संगमनेर (प्रतिनिधी) – गावठी बनावटीचे पिस्तूल व 38 जिवंत काडतुसे बाळगणार्‍या तिघांना शहर पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर रायतेवाडी शिवारात करण्यात आली.

दिलीप कोंडीबा खाडे (वय 28, रा. म्हस्के बुद्रुक ता. शिरुर, जि. पुणे), बाबाजी बबन मुंजाळ (वय 27, रा. डोंगरगाव ता. शिरुर, जि. पुणे), दयानंद मारुती तेलंग (वय 33, रा. टाकळीहाजी, ता. शिरुर) असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. हे तिघे त्यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओ चारचाकी वाहन क्रमांक एमएच 14 एव्ही 3600 मधून प्रवास करत होते.

हे वाहन कोपरगावहून संगमनेरच्या दिशेने येत असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक अभय परमार यांना खबर्‍याकडून मिळाली होती. श्री. परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र डोंगरे, विजय पवार, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडके, अमृत आढाव, साईनाथ तळेकर, प्रमोद गाडेकर यांनी संगमनेर खुर्द शिवारात रायतेवाडी फाटा येथे सापळा लावला. गुरुवारी रात्री 10.45 वाजेच्या सुमारास सदर वाहन पुण्याच्या दिशेने येत असतांना पोलिसांना दिसून आले.

सदर वाहन चालकास वाहन थांबविण्याचा इशारा पोलिसांनी केला. वाहन थांबताच चालकाकडे पोलिसांनी विचारणा केली. त्यानंतर वाहनातील इसमांनी आपली नावे सांगितली. पोलिसांनी त्यांची व वाहनाची झडती घेतली. झडतीमध्ये चालकाच्या शिटखाली गावठी बनावटीचे पिस्तूल व त्याचे मॅक्झीनमध्ये पाच जिवंत काडतुसे व एका प्लॅस्टिक पिशवीमध्ये 33 जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले. या कारवाईत 20 हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅक्झीनसह 5 जिवंत काडतुस, एक काडतुस अंदाजे रक्कम 1 हजार रुपये असे 5 हजार रुपये, 33 हजार रुपयांची 33 काडतुसे, 5 लाख रुपये किंमतीची स्कार्पिओ कार, 10 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असे 20 हजार रुपये व एक 2 हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 5 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

त्यांच्या विरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 83/2020 नुसार भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे दाखल केला आहे. सदर तिघांना अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपींना सहा दिवसांची पोेलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे करत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!