पिंपळनेर उपसरपंचपदी विजय गांगुर्डे

0
पिंपळनेर । वार्ताहर- पिंपळनेर येथील अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणार्‍या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नम्रता पॅनलचे गटनेते विजय गांगुर्डे यांची बिनविरोध निवड झाल्याने एकहाती सत्ता ताब्यात घेण्यात नम्रता पॅनल यशस्वी झाले आहेत.

उपसरपंच पदासाठी योगेश बधान यांनी ही नामांकन अर्ज दाखल केला होता. मात्र एका गटाचे सर्वच्या सर्व नऊ सदस्य गैरहजर राहिल्याने अध्यासी अधिकारी तथा सरपंच साहेबराव देशमुख यांनी निवडणूक प्रक्रिया कायम ठेवून सरपंचासह नऊ सदस्यांनी विजय गांगुर्डे यांच्या बाजूने हात उंचावून मतदान केल्याने निवड घोषित केली. तत्पूर्वी, सरपंच साहेबराव देशमुख यांनी ग्रामपंचायत सभागृहात पदभार स्वीकारला.

सरपंच देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज दि.9 रोजी विशेष सभा बोलाविण्यात आली होती. सकाळी अकरा वाजता उपसरपंच पदासाठी नामांकन अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. विजय गांगुर्डे व योगेश बधान या दोघांनी अर्ज दाखल केले.तर प्रमोद गांगुर्डे यांनी त्यांचा अर्ज माघारी घेतला. दोन वाजता विशेष सभा घेऊन निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली. यात विरोधी शहर विकास गटाचे सर्वच्या सर्व नऊ सदस्य निवडणूक प्रक्रियेला गैरहजर राहिले.त्यामुळे सत्ताधारी गटाचे नऊ सदस्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग सहभाग घेवून निवड प्रक्रिया झाली. यात सरपंच साहेबराव देशमुख, विजय साहेबराव गांगुर्डे, प्रमोद गांगुर्डे, ललिता शिवराम चौरे, कन्हैया परशराम माळी, हिराबाई शरद पवार,मीनाताई पोपट ठाकरे, नूरजहॉ नासिर सैय्यद व सुमनबाई दत्तु बोरसे या सदस्यांनी सहभाग घेतला.

उपसरपंच निवडीमुळे नम्रता पॅनलचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले. निवडणुकीचे कामकाज सचिव तथा ग्रामविकास अधिकारी डी.डी.चौरे यांनी पाहिले. शहर विकास आघाडीचे उपसरपंच पदासाठीचे उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल करूनही त्यांच्या गटाचा एकही सदस्य या प्रक्रियेत सहभागी झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सकाळी अकरा वाजेपासूनच बसस्टॉप चौफुलीवर चाहत्यांनी गर्दी केली होती.शिवाय काही अनुचित प्रकार घडू नये व निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून ग्रामपंचायत आवाराबाहेर पोलीसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून विजय जल्लोष साजरा केला.

LEAVE A REPLY

*