‘पिंपळगाव खांड’ च्या कामास ग्रीन सिग्नल

0
101 कोटी खर्चाच्या सुधारित प्रस्तावास सरकारची मान्यता
कोतूळ (वार्ताहर) – अकोले तालुक्यातील मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरणाच्या 101 कोटी रुपये खर्चाच्या सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावाला शासनाची मान्यता मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शासनाने या कामाला हिरवा कंदील दिला आहे.
अकोले तालुक्यात मुळा नदीवर पिंपळगाव खांड येथे धरणाचे काम सुरू आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या प्रयत्नाने काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने सन 2009 मध्ये 44.59 कोटी रुपये खर्चाच्या पिंपळगाव खांड प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली होती. प्रकल्पाचा खर्च वाढल्याने काम 101 कोटींपर्यंत गेले. यामुळे धरणाच्या कामाला सुधारित प्रशासकीय मंजुरी घेणे आवश्यक होते. सुधारित प्रशासकीय मंजुरी नसल्याने धरणाचे काम रेंगाळले होते.
वाढत्या खर्चाचा विचार करून संगमनेरच्या लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील प्रदिक्षने, सहायक अभियंता संदीप देशमुख, शाखा अभियंता नानासाहेब खर्डे यांनी परिश्रम घेऊन डिसेम्बर 2014 मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता.
राज्यात सत्ता परिवर्तनानंतर ‘सुप्रमा’ देण्याचे धोरणात बदल झाल्याने सुप्रमा साठी विलंब होत होता. राज्य शासनाच्या वित्त विभागाने या प्रस्तावाला मान्यता दिली असून पुढील मान्यतेसाठी आता हा प्रस्ताव राज्याच्या व्यय अग्रक्रम समिती पुढे सादर केला गेला. काही महिन्यांपासून या समितीची बैठक होत नसल्याने निर्णय लांबला होता या समितीची सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच बैठक झाली. या बैठकीत या प्रस्तावाला शासनाने तत्त्वता मान्यता दिली. या मान्यतेनंतर आता या बाबत शासनाचा आदेश लवकरच बाहेर पडून जलसंपदा विभागाकडून सुधारित प्रशासकीय आदेश होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे .
यापूर्वी या प्रस्तावाला जलसंपदा विभाग, राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती नाशिक, नियोजन विभागाची मान्यता मिळाली आहे. प्रस्तावातील तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठीच्या सर्व मान्यता घेण्यात आल्या आहेत. आता फक्त सुप्रमा चा आदेश बाहेर पडण्याची औपचारिकता बाकी आहे. यामुळे मुळा परिसरातील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला
पालकमंत्री प्रा. राम शिंदे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. भाजप नेते अशोकराव भांगरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर वाकचौरे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे, भाजपा तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, पिंपळगाव खांड धरणग्रस्त संघर्ष समितीचे कार्यकर्ते नी मंत्रालयात वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार ,जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची शिष्टमंडळाने वेळोवेळी भेट घेतली.
पिंपळगाव खांड धरणाच्या सुधारित प्रशासकीय मंजुरीला आता राज्य शासनाचा हिरवा कंदील मिळाल्याने धरणग्रस्त संघर्ष समितीच्या कामाला यश मिळाल्याचे पिंपळगाव खांड धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद देशमुख, सचिव सचिन गिते, चंद्रकांत घाटकर, बापूसाहेब देशमुख, गणेश घोलप, श्याम देशमुख, फारुख पठाण, हेमंत देशमुख, रवी वाकचौरे, रवींद्र आरोटे यांनी सांगितले. यामुळे आता लवकरच कोतूळच्या नवीन पुलाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*