पिंपळगाव खांड धरणातील पाणीसाठा निम्म्यावर

भंडारदरातही पावसाची हजेरी

सार्वमत

कोतुळ, भंडारदरा (वार्ताहर) – मुळा पाणलोटात अधून मधून मृगाच्या सरी बरसत असल्याने मुळा नदीवरील 600 दलघफू क्षमतेच्या पिंपळगावखांड धरणातील पाणीसाठा निम्म्यावर पोहचला आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोटातही पाऊस कोसळत असल्याने धरणात धिम्यागतीने पाण्याची आवक होत आहे. रविवारी सायंकाळी 5.30 ते 6 वाजेदरम्यान जोरदार पाऊस झाला. शनिवारी घाटघरला 66 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

मुळा पाणलोटातही पाऊस होत असल्याने उगमस्थान परिसरात मुळा नदी वाहती असून आंबित धरण ओव्हरफ्लो झाले आहे. पिंपळगाव खांड धरणातील पाणीसाठा निम्मा झाला आहे. पाणलोटात पाऊस होत असून काहीशी उघडीप मिळत असल्याने भातरोपे टाकण्याचे काम जोमात सुरू झाले आहे.

अकोले तालुक्यात राजूरसह विविध ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. आजच्या मितीस भंडारदरा धरणात 3 हजार 534 दशलक्ष घनफूट तर भंडारदरा धरणातून 800 क्युसेकने विसर्ग विद्युत टनेल 2 मधून सुरू आहे.

सकाळी संपलेल्या 24 तासांत झालेला पाऊस असा : भंडारदरा-5 (एकूण 316 मिमी), घाटघर- 66 (एकूण 526), रतनवाडी-10(एकूण 384), पांजरे-10मि.मीटर(एकूण 384), वाकी- 2 (276मिमी) पावसाची नोंद झाली आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *