…म्हणून निफाड तालुक्यातील या गावाला ‘रामाचे पिंपळस’ नाव; जाणून घ्या आख्यायिका

0

पिंपळस रामाचे । सोमनाथ मत्सागर

पिंपळस रामाचे येथे आज (दि.13) रोजी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन या यात्रोत्सवासाठी ग्रा.पं. च्या वतीने तयारी पुर्ण करण्यात आली आहे.

येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात श्रीराम नवमीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात. त्रेता युगात प्रभु श्रीराम आपला लहान भाऊ लक्ष्मण व पत्नी सीतामाई यांच्या समवेत 14 वर्षाचा वनवास उपभोगण्यासाठी पंचवटी (नाशिक) परिसरातील दंडक अरण्यात वास्तव्यास असल्याची आख्यायिका आहे.

त्यावेळी हरिण रुपी मारिच राक्षसाची शिकार करण्यासाठी पत्नी हट्टामुळे प्रभू त्या हरिणाचा पाठलाग करत असतांना तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर परिसरात त्या हरिणरुपी मारिच राक्षसाचा वध करुन प्रभु राम त्या काळातील दंडक अरण्यातून पंचवटीकडे परतत असतांना प्रभुंचा बाण ज्यावेळी राक्षसाला लागला तेव्हा लक्ष्मणा धाव असा आवाज त्या हरिण रुपी राक्षसाने केल्याने सितेच्या आग्रहाखातर आपल्या भावाच्या मदतीला लक्ष्मण पंचवटीकडून तत्कालिन दंडक अरण्यातून येत असतांना व प्रभु श्रीराम हरिण रुपी मारिच राक्षसाला मारुन पंचवटीकडे येत असतांना त्यांची दंडक अरण्यातील एका पिंपळाच्या झाडाखाली भेट झाली.

त्या भेटीमध्ये दोघांना खरा प्रकार लक्षात आला. त्यांनी त्याच ठिकाणी संपुर्ण राक्षस जातीचा नाश करण्याचा निश्चय केला. पुढे याच दंडक अरण्याच्या परिसरात पिंपळस गाव वसले.

त्यामध्ये श्रीराम व लक्ष्मण यांची पिंपळाच्या झाडाखाली भेट झाली म्हणुन पिंपळस व याच ठिकाणी राक्षस जातीचा नाश करण्याचा निश्चय प्रभु श्रीरामाने केला म्हणुन रामाचे असे पिंपळस रामाचे नाव या गावाला पडल्याची अख्यायिका आहे. तेव्हापासून दर रामनवमीला येथे भव्य यात्रोत्सव भरतो. गावातील अबालवृद्धांसह लहान थोर सर्व मंडळी यात्रोत्सवाला आवर्जुन हजेरी लावतात.

नोकरी, व्यवसाय, सासुरवासिन, शैक्षणिक इत्यादी कारणास्तव बाहेरगावी राहणारे मुळ पिंपळसकर यात्रेला आवर्जुन उपस्थित असतात. पंचक्रोशितील भाविक देखील आपल्या जीवनातील वेगवेगळे निश्चय करण्यासाठी नवमी निमित्त संकल्प करतात.

ग्रामपालिका व ग्रामस्थांच्या वतीने पाडवा ते नवमी या दरम्यान राममंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येवून नवमीच्या दिवशी दुपारी श्रीराम जन्मोत्सवाचे किर्तन होवून रामजन्मोत्सव साजरा केला जातो. याप्रसंगी टाळमृदुंगाचा गजर, टाळ्यांचा कडकडाट, मंगल वाद्यामधून ढोलताशाचा एकच गजर ऐकावयास मिळतो.

प्राचीन व प्रसिद्ध अशा भव्य दुमजली राममंदिरात महिलांकडून फुलांचा वर्षाव केला जातो. तर सायंकाळी श्रीराम रथाची भव्य मिरवणूक काढली जाते. दारोदारी सुवासिनी रामरायाचे औक्षण करुन दर्शन घेतात तर भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. यंदाच्या श्रीराम जन्मोत्सवास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन यात्रोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन पिंपळस रामाचे येथील ग्रामस्थ, ग्रामपालिका पदाधिकारी व श्रीराम भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*