पीक विम्यासाठी जिल्हाधिकर्‍यांचा पुढाकार

0

शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी सुरुवातीपासून लक्ष घालणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्यावर्षी पीक विम्यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. यंदा पीक विमा योजनेपासून शेतकरी वंचित राहणार नाहीत, यासाठी सुरुवातीपासूनच लक्ष घालणार असल्याचे जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी सांगितले.
याबाबतच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी दौर्‍यादरम्यान प्रशासनाला दिलेल्या आहेत. समृध्दी महामार्गाचा प्रश्‍न आठ दिवसांत मार्गी लावण्यात येणार असून जमिनीचे दर जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी महाजन यांनी सांगितले.
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत महाजन बोलत होते. गेल्यावर्षी जिल्ह्यातच काही तालुक्यांमध्ये कमी प्रमाणात पीक विमा मिळाला असल्याच्या तक्रारी आहेत. यंदा तसे होणार नाही.
जास्ती जास्त शेतकर्‍यांनी पीक विमा उतरवावा, योजनेच्या अंमलबजावणीत त्रुटी राहणार नाहीत. शेतकर्‍यांच्या शकांचे निरसन व्हावे, यासाठी जिल्हातील सर्व तहसीलदारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पीक विमा योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी बँकांमध्ये होणारी गर्दी टाळता यावी, शेतकर्‍यांना अर्ज भरता यावा.
खरीप हंगामापासून गाव पातळीवर अधिकची सुविधा उपलब्ध करण्याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. आपले सरकार सेवा केंद्र ही सुविधा शेतकर्‍यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. जास्तीतजास्त शेतकर्‍यांनी यात सहभागी व्हावे, आवाहन महाजन आणि जिल्हा कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी केले.
दरम्यान, जिल्हा नियोजन भवनात पीक विमा व पीक कापणी प्रयोग राबविण्यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. गेल्यावर्षी खरीप पिकासाठी एक लाख सहा हजार 258 तर रब्बीसाठी एक लाख 63 हजार 67 शेतकर्‍यांना पीक विम्याचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात खरिपाची 54 टक्के पेरणी झाली आहे.
18 दिवसांपासून पाऊस न झाल्याने आगामी 8 दिवसांत पाऊस न पडल्यास मूग, उडदाचे क्षेत्र बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात येईल.
जिल्ह्यातील दोन लाख 57 हजार 777 हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. बाजरीची 61 हजार 444, मका 24 हजार 683, सोयाबीन 43 हजार हेक्टर, मूग 25 हजार 634, उडीद 34 हजार 23 हेक्टरवर पेरणी झाली आहे.
खरीप हंगामासाठी जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना पुढील अटीनुसार अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी विमा क्षेत्र घटक ग्राह्यधरुन राबविण्यासाठी निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती लोणारे यांनी दिली.
कर्जदार शेतकर्‍यांना योजना पीक विमा योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ऐच्छिक आहे. योजनेअंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकरण्यात येणार आहे. शेतकर्‍यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकर्‍यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा खरीप हंगाम-2 टक्के व रब्बी हंगाम 1.5 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत सर्व पिकांसाठी 70 टक्के जोखीमस्तर निश्‍चित करण्यात आला आहे. पिकाचे उंबरठा उत्पन्न म्हणजे मागील 7 वर्षांचे सरासरी उत्पन्न नैसर्गिक आपत्ती जाहीर झालेली 2 वर्षे वगळून त्या पिकांचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्‍चित केले जाईल.
  • 11 हजार कामांना पूर्वसंमती –
    एखाद्या योजनेसाठी असलेल्या उद्दिष्टाप्रमाणे कार्यारंभ आदेश देणे अपेक्षित असताना लक्ष्यांकापेक्षा अधिक दोन हजार अर्जदारांना पूर्वसंमती देण्याची बाब उघड झाली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन यापुढे असा प्रकार न होण्याबाबत तंबी दिली. जिल्ह्यासाठी 9200 शेततळ्यांसाठी लक्ष्यांक असून 11 हजार कामांना पूर्वसंमती देण्यात आली. नऊ हजार शेततळ्यांची कामे सुरू असून सुमारे चार हजार पूर्ण झाली आहेत. तीन हजार 800 लोकांना अनुदान वर्ग करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*