शेवगावात पीक विम्याचे फॉर्म फाडून निषेध

0

15 ऑगस्टपर्यंत मुदत वाढविण्याची मागणी

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील शेतकर्‍यांनी खरीप पीक विमा भरताना येत असलेल्या अनंत अडचणींमुळे गोळा केलेली कागदपत्रे वैतागून काल दि. 5 रोजी फाडून टाकली. तसेच शासनयंत्रणेच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. महिला शेतकर्‍यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या संदर्भात तालुका कृषी अधिकार्‍यांना निवेदन देऊन विमा मुदत 15 ऑगस्ट पर्यंत वाढवून सर्व बँका व गावपातळीवर तलाठ्याकडे विमा रक्कम भरण्याची सोय करण्याची मागणी केली आहे.

हा विमा भरताना सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे ऑनलाईन प्रस्ताव दाखल करण्याची आहे. तसेच काही ठिकाणी तलाठी वेळेवर सापडत नाहीत, तर काही ठिकाणी अडवणूक केली जाते. सर्वसामान्य शेतकरी बुडत्याला काडीचा आधार म्हणून या विम्यासाठी धावपळ करत आहेत. शेतकर्‍यांनी सुरुवातीला पडलेल्या अल्पशा व पुढे पाऊस पडेन या आशेने कापूस, तूर, उडीद, मूग, बाजरी, सोयाबीनची पेरणी केली.

मात्र पावसाने दोन महिन्यापासून दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. या परिस्थितीत शेतकर्‍यांना आधार मिळावा म्हणून पीक विम्याची हमी दिलेली आहे. मात्र हा आधार डळमळीत होण्याचे प्रकार घडत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. मागील 4 वर्षात पाऊस न झाल्याने शेतकर्‍यांची आर्थिक व्यवहार पार गडगडलेले आहेत. तरीही शेतकरी उसनवारी करत, घरातील किडूकमिडूक मोडून विमा भरण्यासाठी धावपळ करतांना दिसत आहेत. मात्र या मार्गातील विविध अडथळे पार करताना शेतकर्‍यांचा दम तुटू लागला आहे.

वैतागलेल्या शेतकर्‍यांनी काल ही कागदपत्रे फाडून टाकली. मात्र त्यांचा भविष्यकाळ खडतर जाणार आहे, याचा विचार करुन विमा मुदत 15 ऑगस्ट पर्यंत वाढवावी. सर्व बँकाना विमा रक्कम स्वीकारावी. पीक विमा ऑनलाईन करण्याची सक्ती करू नये. पर्यायी व्यवस्था म्हणून गाव पातळीवर तलाठ्याकडे पैसे भरण्याची सोय करावी अशा मागण्या शेतकर्‍यांनी केल्या असून तसे आदेश देण्याची विनंती केली आहे.

निवेदन देण्यासाठी वरूर येथील पांडुरंग कृषी विज्ञान मंडळाचे किरण म्हस्के, शेषराव म्हस्के, अशोक वावरे, सालवडगाव येथील जगदंबा कृषी विज्ञान मंडळाचे बप्पासाहेब लांडे, भाऊसाहेब औटी, रज्जाक शेख, कुंडलिक मुंगसे, कांबी येथील ज्ञानेश्वर कृषी विज्ञान मंडळाचे भिमराव माने, रवींद्र राजपुत, आक्रुर जाधव तसेच दशरथ केसभट, गंगाधर नलगे, काकासाहेब निजवे, जनार्धन थोरात, शाहुजी नांगरे, महादेव पाखरे, इंदुबाई जवरे, होसाबाई बर्डे, जनाबाई घनवट, द्रौपदाबाई घनवट, संगिता डाके आदी शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*