Phoyo Gallery : शोभायात्रांनी होणार पाडवा मंगलमय

0

नाशिक : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणानिमित्त शहरातील सर्वच बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. गुढी उभारण्यसाठी लागणारी बांबूची काठी, साखरेच्या माळा, फळे, फुले, चाफ्याची माळ, कलश, मिनी गुढीसह अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी आज बाजारपेठेत गर्दी दिसून आली. नववर्षाचा मुहूर्त साधत ग्राहकांकडूनही विविध वस्तू खरेदीला प्राधान्य दिले जात असल्याने ग्राहकांसाठी व्यापारीवर्गाने विविध योजनाही जाहीर केल्या आहेत. नोटबंदीनंतर बाजारपेठेतील उलाढाल मोठ्या प्रमाणात थंडावली होती. मात्र गुढीपाडव्यानिमित्त मोठ्या प्रमाणावर उलाढाल होण्याची अपेक्षा व्यापारी वर्गाने वर्तवली आहे.

शहरातील रविवार कारंजा, दहिपूल, सराफ बाजार, कापड बाजार, बोहरपट्टी या ठिकाणी गुढी उभारण्यासाठी लागणार्‍या बांबूच्या काठ्या विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 20 ते 80 रुपयांप्रमाणे या काठ्यांची विक्री होत आहे. शहरातील ठिकठिकाणी साखरेच्या माळांची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. एका माळेची किंमत 20 ते 50 रुपये आहे. गुढीसाठी ब्लाऊज पिस, साडी अशी वस्त्रे वापरली जात असली तरी खास गुढीसाठी भरजरी आणि जरीकाठच्या साड्या बाजारात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पाडव्यानिमित्त उद्या मंगळवारी शहर तसेच उपनगरातून नववर्ष स्वागत समितीच्या वतीने स्वागत यात्रांचे आयोजन केले आहे. आज दिवसभर या यात्रांच्या तयारीचे नियोजन संयोजकांकडून सुरू होते.
सोन्याला झळाळी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत सोने खरेदीला पसंती दिली जाते. सणानिमित्त अनेकांनी सोने, चांदी खरेदी आणि गृहप्रवेशासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधण्याचे नियेाजन केले आहे. या दिवशी सोने-चांदीचे दागिने घेणे पसंत केले जाते. काहींनी पसंतीनुसार दागिने बनवण्यासाठी ऑर्डर दिली आहे. त्यामुळे सराफ बाजारालाही झळाळी मिळाली आहे.
वाहन उद्योगही तेजीत : दुचाकी, चारचाकी, विक्रीसाठी कंपन्यांकडून 100 टक्के अर्थसहाय्यासह काहींनी शून्य टक्के व्याजदराच्या योजना जाहीर करत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. आर्थिक वर्ष संपत असताना वाहन विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास दुचाकी विक्रेत्या कंपन्या सज्ज झाल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शोरूमसमोर आकर्षक सजावट करून जाहीर केलेल्या योजना ग्राहकांच्या चटकन नजरेस पडतील याची काळजी घेतली जात आहे.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर आकर्षक सवलत : इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवर यानिमित्त विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. मोबाईल, लॅपटॉप, होम थिएटर, होम अप्लायसेन्स, फ्रीज इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवर शून्य टक्के व्याजदार तसेच विशिष्ट रकमेच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू अशा ग्राहकांना आकर्षिक करणार्‍या विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
रेडिमेड गुढ्यांना मागणी : बदलत्या काळानुसार सणवार साजरे करण्यालाही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे बाजारपेठेत तयार गुढी दाखल झाली असून त्याला नागरिकांचीही मागणी वाढत आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे फ्लॅट संस्कृती आली. फ्लॅट संस्कृती रुजल्याने मांगल्याची गुढी उभारायलादेखील जागा नसल्याने छोट्या तयार गुढ्या बाजारपेठेमध्ये दाखल झाल्या आहेत. ही गुढी देव्हार्‍यावर, मोटारीमध्येही ठेवता येते. दीड फुटाची गुढी 200 रुपये, एक फुटापर्यंतची गुढी 150 रुपये तर 9 इंच उंचीची गुढी 100 रुपयांपर्यंत बाजारपेठेत उपलब्ध आहे. तयार गुढी खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. तसेच साखर गाठींनादेखील मागणी आहे. पाडव्याला विशेष महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्‍या साखर गाठींना विशेष मागणी असून छोट्या साखर गाठींच्या हारांचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. साखर गाठीमध्ये खारीक व नारळमध्ये असणार्‍या गाठ्या बाजारात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

*