Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedPHOTO : बिपिन रावत यांच्या जाण्यानं देशावर शोककळा, संभाजीराजेंकडून आठवणींना उजाळा

PHOTO : बिपिन रावत यांच्या जाण्यानं देशावर शोककळा, संभाजीराजेंकडून आठवणींना उजाळा

मुंबई l Mumbai

भारताचे पहिले चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर सर्व देशावर शोककळा पसरली आहे. भारताच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी पेलणाऱ्या बिपीन रावत यांच्या अचानक जाण्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे.

- Advertisement -

अनेक क्षेत्रातील मंडळी दुर्देवी घटनेवर प्रतिक्रिया देऊन बिपीन रावत यांच्यासह अपघातातील मृत्यू झालेल्यांबद्दल हळहळ व्यक्त करत आहेत. खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (भोसले) यांनीही बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या आठवणींना उजाळात देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी म्हंटले आहे की, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत, श्रीमती मधुलिका रावत यांचे व छत्रपती घराण्याचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास असलेले लष्करप्रमुख आज आपल्यातून निघून गेले, हे मनाला अजूनही पटत नाही.

२०१८ साली दिल्ली येथे आयोजित केलेल्या शिवजयंती महोत्सवास जनरल रावत मोठ्या अभिमानाने उपस्थित राहिले होते. २०१९ साली पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरात मदतकार्य राबविण्यासाठी मला त्यांचे खूप मोठे सहकार्य लाभले होते.

छत्रपती शिवाजी महाराज व संपूर्ण छत्रपती घराण्याविषयी त्यांच्या मनात खूप आदर व अभिमान होता. मी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र भेट दिले होते, तेव्हा त्यांनी खूप आनंद व्यक्त केला होता.

दिल्ली येथील माझ्या निवासस्थानी ते आले असता ताराबाई महाराणीसहेबांचे तैलचित्र पाहून त्यांनी अत्यंत उत्सुकतेने त्यांच्याबद्दल माहिती घेतली होती व युद्धशास्त्रात त्यांचा इतिहास शिकवला जावा, यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती.

कोल्हापूर येथे लष्कराच्या कार्यक्रमास उपस्थित असताना मोठ्या आपुलकीने त्यांनी नवीन राजवाड्यास भेट देऊन छत्रपती घराण्याचा पाहुणचार स्वीकारला होता.

जनरल बिपीन रावत हे थलसेना प्रमुख असताना ऑक्टोबर २०१८ मध्ये कोल्हापूर येथे १०९ मराठा लाइट इन्फंट्री प्रादेशिक बटालियनच्या कार्यक्रमास आले होते. यावेळी छत्रपतींचे निवासस्थान असलेल्या नवीन राजवाड्यास अत्यंत आपुलकीने भेट देऊन स्नेहभोजन केले होते.

छत्रपती घराण्याविषयी त्यांच्या मनात असलेला आदर व वैयक्तिक मझ्याविषयी त्यांचे असणारे प्रेम त्यांच्या आठवणींच्या रूपात नेहमी स्मरणात राहील….

जनरल रावत व त्यांच्या कुटुंबीयांशी आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या अशा आकस्मिक व धक्कादायी जाण्याने एक मित्र व मार्गदर्शक गमावल्याची खंत मनाला लागून राहिली आहे…. संपूर्ण राष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले…

- Advertisment -

ताज्या बातम्या