
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
रंगपंचमी (Rangpanchami) म्हणजे रंगांचा सण. या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. कडक उन्हापासून अंगाची दाह शांत व्हावी म्हणून हे रंग उधळले जातात. रंगपंचमीचा सण साजरा करण्यासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत....
दोन वर्षांपासून करोनामुळे (Corona) सर्व सणांवर बंदी घालण्यात आली होती. यंदा मात्र रंगपंचमीला शासनाने (Government) परवानगी दिली आहे. त्यामुळे हा सण अगदी जल्लोषात साजरा करण्यासाठी जिल्हावासीय सज्ज झाले असून नाशकात जय्यत तयारी सुरू आहे.
बाजारपेठेत नानाविध पिचकाऱ्या, रंग आणि इतर साहित्यांच्या खरेदीसाठी रेलचेल दिसून येत आहे. रंगपंचमीमुळे दुकानेही बंद असण्याची शक्यता असल्यामुळे मिठाई खरेदी करण्यासाठी देखील गर्दी केल्याचे दिसून येत आहे.
यंदा शहरात रंगपंचमीचा (Rangpanchami) सण मोठ्या प्रमाणावर साजरा होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जावी,यासाठी शहरात कडेकोट पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. रासायनिक रंगांऐवजी कोरडे रंग खेळण्यावर भर द्यावा, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.
रंगपंचमीच्या दिवशी नाशकात रहाडीमध्ये आनंदोत्सव साजरा करण्याची खूप जुनी परंपरा आहे. शनि चौक, तिवंध्यातील बुधा हलवाई जवळची, जुन्या तांबट लेनमधील, गाडगे महाराज पुलाजवळील दिल्ली दरवाजा आणि काजीपुरा, दंडे हनुमान येथे रहाडी आहेत.
नाशिकचा चेहरामोहरा बदलला असला तरी रहाडींमध्ये रंग खेळण्याची परंपरा नाशिककरांनी अद्यापही जपली आहे.शहरातील रहाडी वेगवेगळ्या रंगाच्या असतात.=
त्यांचा हा रंग पूर्वीपासून ठरलेला आहे. पंचवटीतील शनी चौकात असलेल्या रहाडीचा रंग गुलाबी असून, पूजेचा मान सरदार रास्ते आखाडा तालिम संघाकडे आहे. गाडगे महाराज पुलाजवळ असलेल्या रहाडीचा रंग पिवळा असून, या रहाडीच्या पूजेचा मान सोमनाथ वासुदेव बेळे यांच्याकडे आहे.
तिवंधा चौकातील रहाडीचा रंग केशरी असून याच्या पूजेचा मान मधली होळी तालमी संघाकडे आहे.या रहाडींमध्ये रंग उकळून टाकला जातो.विधीवत पूजन करून रंग खेळण्याला सुरुवात केली जाते.