
सुप्रसिद्ध कथक नार्थक पंडित बिरजू महाराज यांचा जन्म आज (दि. ०४) लखनौ येथे झाला. ते लखनौ घराण्यातील कथ्थक नृत्याचे प्रमुख प्रतिनिधी. काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज पंडित बिरजू महाराज यांच्या जन्मदिनाच्या निमित्त घेतलेला त्यांच्या जीवनकार्याचा आढावा...
पं. बिरजू महाराज (Pandit Birju Maharaj) यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनौ येथे झाला. त्यांचे खरे नाव पंडित बृजमोहन मिश्रा होते. कथ्थक (Kathak) नर्तनासोबतच ते शास्त्रीय गायकही होते. बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरु अच्छन महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हेसुद्धा प्रसिद्ध कथ्थक नर्तक होते. आपल्या वडील आणि काकांकडूनच त्यांनी नृत्याचे धडे घेतले.
कथ्थक नृत्याचे नुसते नाव जरी समोर आले तरी पंडित बिरजू महाराजांचीच आठवण येते. बिरजू महाराजांनी कथ्थक नृत्याला केवळ प्रतिष्ठा मिळवून दिली नाही तर कलेतील अस्सल अभिजाततादेखील जपली. पुरुषाच्या जातीला नृत्य बरे नव्हे, अशा मानसिकतेला महाराजांचे आयुष्य हे एक प्रभावी उत्तर म्हणता येईल.
कथ्थक हा भारतातील एक प्राचीन नृत्यप्रकार आहे. जयपुर (Jaipur), वाराणसी (Varanasi) आणि लखनौ (Lucknow) ही नृत्यातील मुख्य घराणी आहेत. भारताच्या इतर नृत्यप्रकारांच्या तुलनेत कथ्थकचा पेहराव एकदम साधा आणि सरळ आहे. कथ्थक नृत्यप्रकाराला सामान्य माणसाच्या कक्षेत आणले ते पंडित बिरजू महाराजांनी (Pandit Birju Maharaj). बिरजू महाराजांना आधुनिक कथ्थक नृत्याचे शिल्पकार, प्रसिद्ध कथ्थक सम्राट, पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज अशा विविध उपाधींसह ओळखले जात होते.
बिरजू महाराजांनी तबला वादन, गायन अशा सर्वच कलांचे वरदान लाभले होते. वयाच्या अगदी सातव्या वर्षी बिरजू महाराजांनी आपला पहिला नृत्याविष्कार सादर केला. तेराव्या वर्षात पदार्पण करतानाच ते नृत्यगुरू बनले. संगीत भारती, भारतीय कला केंद्र, कथ्थक कला केंद्र अशा संस्थामधून कथ्थकचे गुरू म्हणून कलादान करत ते स्वतः स्थापन केलेल्या ‘कलाश्रम’या संस्थेचे महागुरू बनले.
बिरजू महाराजांनी अनेक नृत्यनाट्यांची रचना केलेली आहे. त्यातील काही प्रसिद्ध आणि लोकप्रिय नावे म्हणजे- ‘फाग-लीला’, ‘मालती-माधव’, ‘कुमार संभव’, इ. देवदास, देढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटांसाठी बिरजू महाराज यांनी नृत्यदिग्दर्शन देखील केलं आहे. याशिवाय सत्यजित रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटातही त्यांनी नृत्यदिग्दर्शन केले होते.
पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान
बिरजू महाराज यांना 1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने (Padma Vibhushan Award) सन्मानित करण्यात आले होते. यासोबतच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला आहे. बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठानेही बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट बहाल केली.
2012 मध्ये, त्यांना विश्वरुपम चित्रपटातील नृत्य नृत्यदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2016 मध्ये, बाजीराव मस्तानी सिनेमातील मोहे रंग दो लाल गाण्याच्या नृत्य दिग्दर्शनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले.