ऑगस्ट क्रांती दिन
ऑगस्ट क्रांती दिन
फोटो गॅलरी

आठवणी क्रांती दिनाच्या

असे पेटले आंदोलन

jitendra zavar

jitendra zavar

क्रांतीची धगधगती मशाल हातात घेऊन देशात स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी ज्या हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांचा स्मृतीदिन म्हणून जो दिवस साजरा केला जातो त्याला ‘ऑगस्ट क्रांती दिन’ म्हणतात. आज ऑगस्ट क्रांती दिनास ७८ वर्ष होत आहे.

ऑगस्ट क्रांती दिनाचा मसुदा सेवाग्राम येथे ९ जुलै रोजी बापुकुटीतील आदी निवासात तयार करण्यात आला. १४ जुलै रोजी कॉंग्रेस कार्य समितीतर्फे त्याला अंतिम स्वरूप दिले गेले. त्या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देण्यात आली. सेवाग्राम येथे झालेल्या या मसुदा बैठकीत जनआंदोलनाचे नियम, आंदोलन पेटविण्यासाठी सर्व अधिकार महात्मा गांधींकडे देण्यात आले होते. त्यानंतर ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबई येथे ब्रिटीशांना भारत छोडो असा इशारा देण्यात आला.

महात्मा गांधींनी ‍केलेली 'छोडो भारत'ची गर्जना ‍आणि दिलेला ''करेंगे या मरेंगे'' हा मंत्र नऊ ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता. त्यामुळे यादिवशी क्रांतीची ज्योतच जणू पेटली. देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरवात झाली. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळींना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती. त्यांना सर्वांना पुण्यात हलविण्यात आले. चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई आणि मीराबेन या चौघांना खाली उतरवून त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली. बाकीच्यांना पुढे नेण्यात आले. ही बातमी फुटली. गांधीजींना पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये आणि नेहरू, पटेल, आझाद या मंडळींना अहमदनगरच्या किल्यात ठेवण्यात आल्याचे समजले.

नेत्यांची धरपकड झाल्याने आंदोलन लोकांच्या ताब्यात गेले. देशभर जागजागी हरताळ, मिरवणुका, मोर्चे यांना ऊत आला. सरकारने लोकांना एकत्र जमण्यास बंदी घातली. पण लोक आता आदेश मानायला तयार नव्हते. पोलिसांच्या लाठीहल्ल्याला, गोळीबाराला जुमानत नव्हते. जाळपोळ, पोलिसांचे खून, टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरू झाले.

इंग्रजांनी इतक्या लोकांना अटक केले की, जेलमध्ये जागाच शिल्लक राहिली नाही. इंग्रज कोणत्याही व्यक्तीला अटक करुन डांबत होते. या आंदोलनात लोकांनी पोलिस ठाणे देखील नेस्तनाबूत केले. टेलिफोन सुविधा बंद केल्या. त्यामुळे भांबवलेल्या ब्रिटिश सरकारने आंदोलकांवर गोळीबार सुरु करण्याचा आदेश दिला. मात्र, लोकांनी ब्रिटिशांच्या गोळीबाराला, लाठी हल्ल्याला न घाबरता आंदोलन सुरु ठेवले. सरकारी आकडेवारीनुसार या आंदोलनात ९४० जण शहीद झाले. १६३० जखमी झाले. १८ हजार जण नजरकैदेत होते. ६० हजार २२९ जणांना अटक झाली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com