Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याजागतिक पर्यटन दिन : जाणून घ्या नाशिक शहरातील महत्वाचे पर्यटन स्थळे

जागतिक पर्यटन दिन : जाणून घ्या नाशिक शहरातील महत्वाचे पर्यटन स्थळे

ज्यांना मुक्त भटकायची, मनमुराद फिरायची आवड आहे, त्यांच्यासाठी नाशिक शहर व जिल्हा पर्यटनासाठी नंदनवनच आहे. ऐतिहासिक, धार्मिक महत्वाबरोबर निसर्गाने दिलेले सौदयामुळे पर्यटक नाशिकच्या प्रेमात पडतो. २७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन. त्यानिमित्ताने नाशिक शहरातील प्रमुख पर्यटनस्थळाची ही माहिती… (सर्व छायाचित्र – सतीश देवगिरे)

नाशिकमध्ये कसे पोहचाल

- Advertisement -

रेल्वेद्वारे

मुंबई शहरातील कल्याण, मनमाड ते भुसावळ आणि कोलकाता किंवा दिल्ली या शहरासाठी नाशिकरोड स्थानक महत्त्वाचे स्थानक आहे. मुंबईपासून १६६ किमी आहे.

विमानाद्वारे

नाशिकला ओझर विमानतळ सुमारे २४ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईहून किंवा इतर महत्वाच्या शहरांमधून नाशिकला विमानसेवा आहे.

रस्त्याद्वारे

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग नाशिक शहरातून जातो. नाशिक शहर सूरत, मुंबई आणि औरंगाबाद, पुणे, धुळे, अहमदनगर आणि भारतातील इतर सर्व महत्त्वाच्या शहरांशीही जोडलेले आहे.

श्री सोमेश्वर मंदीर

हे मंदीर नाशिक मध्यवर्ती बस स्थानकापासुन 8 कि.मी अंतरावर गंगापुर रस्त्यावर आहे.गोदावरी तीरी असलेल्या हया मंदिरात भगवान शिव व हुनुमानाची मुर्ती असुन परिसर वृक्षवेलींनी वेढलेला आहे.दर्शनांनतर नदीत बोटिंग व पोहण्याचा आनंद घेता येतो. सोमेश्वर हे चित्रपटांच्या शुटींगसाठी देखील प्रसिध्द आहे.सोमेश्वरला जातांना ‘’आनंदवल्ली’’ नावाचा परिसर लागतो.या परिसराचे नाव पेशवे राघोबादादा यांचे पत्नी आनंदीबाई यांचेमुळे ठेवण्यात आले आहे.त्यांचा हया ठिकाणी काही काळ निवास होता. त्यांनी आनंदवल्ली येथे गोदावरी तिरावर नवश्यागणपतीचे आकर्षक मंदिर बांधले आहे.

दुधसागर धबधबा

दुधसागर धबधबा हा नाशिकपासून सुमारे 8 कि.मी. अंतरावरील सोमेश्वर येथे आहे. हा धबधबा हा प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे. सुमारे 10 मीटरचा शुभ्र पाण्याच्या फेसाने फेसाळलेला या धबधब्याला दुध सागर हे नाव पडलेले आहे. दुधसागर म्हणजे एक प्रकारे दुधाच्या समुद्राचा आभास सदर ठिकाणी निर्माण होतो.

काळाराम मंदीर

काळाराम मंदीर सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले. प्रभु रामचंद्र आपल्या वनवासा दरम्यान ज्या जागी राहिले त्या ठिकाणी हे मंदीर होते,असे मानले जाते.सदर मंदीराचे बांधकामासाठी 2 हजार कारागिर 12 वर्ष राबत होते.पश्चिम भारतातील प्रभु रामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी एक असे हे मंदीर आहे.245 फुट लांब व 145 फुट रुंद मंदिर परिसराला 17 फुट उच दगडाची भिंत आहे.मंदिरासाठी सर्व बाजुंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे.मंदिरात प्रभू रामचंद्र, सिता, लक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील 2 फुट उंचीच्या मुर्त्या आहेत.चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येतो.

सीता गुफा

श्रीकाळाराम मंदिराच्या उत्तरेस हे स्थान आहे. सीतचे वास्तव्य या ठिकाणी होते म्हणून हे स्थान सीतागुंफा नावाने ओळखले जाते. सीतागुंफेत भुयारा सारख्या अरूंद मार्गातून जावून येण्यास लहान मुलांना गंमत वाटते.

भक्तीधाम

भक्तीधाम (कैलासमठ) हे स्थान पंचवटीमध्ये पेठरोडवर आहे. येथे विद्वान वेद-वेदांग शास्त्राचे पठण करण्यासाठी येतात. तसेच येथे विद्यार्थ्यांसाठी निवासी वेदपाठशाळा चालविली जाते. यात्रेकरूंना राहण्यासाठी या ठिकाणी चांगली व्यवस्था आहे.

रामकुंड

रामकुंड हे नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात असून मध्यवर्ती बसस्थानकापासून दोन कि.मी. अंतरावर आहे. वनवासादरम्यान या ठिकाणी प्रभुराम स्नान करीत होते अशी मान्यता असल्याने यास पवित्र समजले जाते. या कुंडा जवळच ‘’अस्थिविलय तीर्थ ‘’ आहे. रामकुंडाचे बांधकाम सातारा जिल्हयातील खटावचे जमिनदार चित्रराव खटाव यांनी 1696 मध्ये केले. शश्रीमंत माधवराव पेशवे (चौथे पेशवे) यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी नंतरच्या काळात रामकुंडाची दुरुस्ती केली.भाविक आपल्या मृत नातेवाइकांच्या अस्थि, अस्थिविलयकुंडात विसर्जित करतात.महात्मा गांधी,पंडीत नेहरु,इंदिरा गांधी,यशवंतराव चव्हाण यांचेसह अनेक महान नेत्यांच्या अस्थि रामकुंड येथे विसर्जित करण्यात आल्या आहेत.

पांडव लेणी

नाशिकच्या पांडव लेणीही प्रसिध्द आहेत. नाशिक नवीन बसस्थानकापासुन ५ व महामार्ग बसस्थानकापासुन ४ कि.मी. अंतरावर एका मोठ्या टेकडीवर या लेण्या आहेत. ही लेणी मात्र प्राचीन आहेत. सुमारे २५०० वर्षापूर्वींची. येथे जो पाली भाषेतील शिलालेख आहे त्यावरुन ही लेणी २००० वर्षांपूर्वीचीच असल्याचे निश्चित समजले जाते. एकूण २४ लेणी आहेत. काही लेण्या व त्यातील मूर्त्या चांगल्या स्वरुपात तर काही खंडीत स्वरुपात शिल्लक आहेत. बुध्दस्तुप, भिक्षूंची निवासस्थाने, बुध्दबोधिसविता, जैन तीर्थकर ऋषभदेवजी, वीर मणिभद्रजी, माता अंबिकादेवी यांच्या मूर्त्या, पाच पांडवसदृशमूर्त्या, भीमाची गदा, कौरव मूर्त्या, इंद्रसभा, देवादिकांच्या मूर्त्या या सर्व लेण्यात आहेत. मूर्त्यांची शिल्पकता वाखाणण्यासारखी आहे

पंचवटी

नाशिक शहरात पंचवटी परीसर हा गोदावरी नदीच्या डाव्यातीरावर आहे. काळाराम मंदीरा जवळ वटवृक्षांचा समुह असुन हा समुह पाच वटवृक्षांपासून तयार झाला असल्याने या परिसरास ‘ पंचवटी ’ असे म्हटले जाते. ‘पंच’ म्हणजे पाच व ‘वटी’ म्हणजे वडाचे झाड असा अर्थ होतो. काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, गंगा-गोदावरी मंदिर, सुंदर नारायण मंदिर, टाळकुटेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, गोराराम मंदिर, मुरलीधर मंदिर, तिळभांडेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, सांडव्याची देवी मंदिर, विठ्ठलमंदिर, पाताळेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, रामकुंड, दुतोंडया मारुती, कार्तिकस्वामी मंदिर, काटयामारुती मंदीर, पंचमुखी हनुमान मंदिर, भद्रकाली मंदिर, कपुरथळा स्मारक अशी अनेक मंदिरे पंचवटी व सभोवतालच्या परिसरामध्ये गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर आहेत. या मंदिरांमुळेच नाशिकला ‘’पश्चिम भारताची काशी ‘’असे म्हटले जाते

मुक्तीधाम

नाशिकरोड मधील सर्वात भव्य मंदिर कै.जयरामभाई बिटको यांनी २३ लाख रूपये खर्च करून एक आधुनिक संगमरवरी देवस्थान उभे केले आहे. राजस्थान मधील मक्रान (जयपूर) येथून आणलेला दगड व राजस्थानी कारागीर यांनी हे शिल्प घडविले . गीतेचे श्लोक या मंदिराच्या भितीवर कोरलेले आहेत. सर्व म्हणजे १२ ज्योर्तिलिगांचे देखावे प्रेक्षणीय आहेत. बहुतेक सर्व मोठया देवदेवतांचे दर्शन येथे एकत्र होते. जवळच एक उद्यान आहे. भक्तांसाठी राहण्याची सोय मुक्तीधामच्या परिसरात आहे.

चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक

चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे अत्यंत आकर्षक स्मारक पांडवलेण्याच्या पायथ्याशी नाशिक महानगरपालिकेने साकारले आहे. या जागेचे क्षेत्रफळ ११.७५ एकर असून डोंगराच्या पूर्व आणि उत्तरेच्या उतरणीवरून वाहणाऱ्या पाण्याचा नैसर्गिक उपयोग करून हे नयनरम्य स्थान निर्माण झाले. मध्यवर्ती जलसंचय हे केंद्रस्थान मानून भोवताली टेरेसेसची आखणी करून खुला रंगमंच उभारला आहे. तसेच २५० प्रेक्षक बसतील असे छोटे चित्रपटगृह, कॅन्टीन व रंगबेरंगी तरंगती कारंजी व येथे विहरण्यासाठी हिरवेगार लॉन असे चित्ताकर्षक नवे पर्यटन स्थळ निर्माण झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या