गच्चीवरच फुलवली कमळ, कुमुदिनी व जलीय वनस्पतींची बाग..!

कुमुदिनीच्या एका नवीन संकरीत प्रजातीची निर्मिती : आंतराष्ट्रीय पातळीवर नोंद
गच्चीवरच फुलवली कमळ, कुमुदिनी व जलीय वनस्पतींची बाग..!

भिंगार येथील रहिवाशी असलेले सौ. दिपा व जयराम श्रीरंग सातपुते या निसर्गप्रेमी शिक्षक दाम्पत्याने घराच्या टेरेसवर विविध रंगांच्या कमळ-कुमुदिनी व विविध प्रकारच्या दुर्मिळ जलीय वनस्पतींची आगळी वेगळी बागच फुलवली आहे.

या जलीय वनस्पतींवर तीन वर्षांपासुन संशोधन करून कृञीम परागीभवन प्रक्रियेतुन त्यांनी निर्माण केलेल्या कुमुदिनीच्या एका नवीन प्रजातीला आंतराष्ट्रीय स्तरावर मान्यताही मिळाली आहे.

या नवीन प्रजातीची त्यांच्या नावाने रजिस्टर देखील झाले आहे. जागतिक स्तरावर कुमुदिनीच्या नवीन संकरीत प्रजातीची असे यशस्वीरीत्या नोंद करणारे ते दुसरे भारतीय ठरले आहेत.

त्यांच्या या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांना मिळालेले सन्मानपञ नुकतेच जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भोसले यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा कृषीअधिकारी श्री.शिवाजी जगताप व जिल्हाउपवन संरक्षक अधिकारी श्री.एम.आदर्श रेड्डी आदी उपस्थित होते.

जिल्हापरिषदेत शिक्षक म्हणुन कार्यरत असलेले सातपुते यांनी कृत्रीम परागीभवनातुन तयार केलेल्या कुमुदिनीचा रंग मनमोहक आकाशी असुन ती अतिशय सुगंधी आहे. ही कुमुदिनी इतर प्रजातींप्रमाणे हिवाळ्यात सुप्तावस्थेत न जाता वर्षभर फुले देते.

अमेरिकेतील IWGS अर्थात इंटरनॅशनल वाॅटरलिली अँड अॅक्वाटिक गार्डनिंग सोसायटी (International Waterlily and Water Aquatic Society) या संस्थेने त्यांच्या या नवीन विकसित केलेल्या प्रजातीला अधिकृतरित्या मान्यताही दिली आहे.

यापुढे 'निम्फिया स्काय-जय' या नावाने कुमुदानीची ही प्रजात जगभर ओळखली जाणार असुन तिचे याच नावाने नोंदही पुर्ण झाली आहे.

कुमुदिनीच्या या नावातील स्काय हा शब्द तिच्या फुलांच्या रंगावरून तर जय हा शब्द संशोधकाच्या नावातील आद्याक्षरांवरून घेण्यात आलेला आहे.

सातपुते कुटुंबीयांनी त्यांच्या टेरेस गार्डनमध्ये एक इंच आकाराच्या कमळफुलापासुन एक हजार पाकळी कमळापर्यंत अशा सुमारे २५ पेक्षा अधिक प्रकारच्या कमळांच्या प्रजाती, ८०पेक्षा अधिक प्रकारच्या कुमुदिनी तर ३० पेक्षा अधिक प्रकारच्या वैविध्यपुर्ण दुर्मिळ जलीय वनस्पतींचा समावेश केला आहे.

इतक्या वैविध्यपुर्ण जलीय वनस्पतींचे टेरेसवर संकलन करून विलोभनिय जलीय बाग तयार करणारे ते जिल्ह्यातील पहिलेच कुटुंबीय ठरले आहे.

या वनस्पतींचे संकलन त्यांनी देशभरातील विविध ठिकाणांहुन केलेले आहे.

त्यांची ही आगळी वेगळी बाग पाहण्यासाठी राज्यभरातील निसर्गअभ्यासक, वनस्पती शास्ञाचा अभ्यास करणारे प्राध्यापक, विद्यार्थी व निसर्गप्रेमी सातत्याने भेटी देत आहेत.

त्यांच्या या जलीय बागेमुळे हजारो मधमाश्यांची चिखलपाण्याची गरज, असंख्य पक्षांची तहान भागवली जात आहे.

या बरोबरच त्यांनी या पाण्यात संवर्धित केलेल्या शेकडो गप्पी माशांमुळे परिसरातील डासांची पैदासही घटली आहे. ज्यामुळे पर्यावरणाचेही संवर्धन होत आहे.

जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या आणखी एका प्राथमिक शिक्षकाने वनस्पतीशास्ञ विषयात आंतरराष्ट्रीय पातळीवर दखलपात्र संशोधनकार्य केल्यामुळे शैक्षणिक वर्तुळातुनही त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

श्री.सातपुते सर हे सातत्याने विविध घटकांवर संशोधन करत असुन अशी संशोधकवृत्ती विद्यार्थ्यांमध्येही वृद्धींगत व्हावी यासाठी विविधतापुर्ण जिल्हाव्यापी उपक्रम सातत्याने राबवित आहेत.

या शिक्षक दांम्पत्यांच्या या संशोधन कार्याबद्दल जिल्हाधिकारी श्री.डाॅ.राजेंद्र भोसले, जिल्हाउपवन संरक्षक अधिकारी श्री.एम.आदर्श रेड्डी, जिल्हा कृषी अधिकारी श्री.शिवाजी जगताप, राज्याचे शिक्षण सहसंचालक श्री.दिनकर टेमकर, उपसंचालक श्री.रमाकांत काठमोरे व शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ व केंद्रप्रमुख श्रीम.घावटे यांनीही त्यांचे व्यक्तीश:अभिनंदन केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com