तंत्रज्ञानाने होणार शेतीचा ‘मेकओव्हर’
गॅजेट

तंत्रज्ञानाने होणार शेतीचा ‘मेकओव्हर’

Sarvmat Digital

शेती गेल्या वीस वर्षांत तंत्रज्ञानामुळे बदलत गेल्याचा अनुभव आपण घेतला आहे. आगामी वीस वर्षांत आणखी वेगवान बदल होणार आहेत.संगणक, रोबो, सेन्सर, सॉफ्टवेअर, ड्रोन आणि लाइव्हस्टॉक बायोमॅट्रिक अशा तंत्रज्ञानामुळे शेती आणि शेतीपूरक व्यवसायांचा चेहरामोहराच बदलून जाणार आहे.

तंत्राधारित दुनियेत सर्वच क्षेत्रांमध्ये बदल होत चालले आहेत, तसेच शेतीचेही स्वरूप बदलणार आहे. ऑटोमेशन सिस्टिम, सेन्सर्स आणि शेतात काम करणारे यंत्रमानव असे भविष्यातील शेतीचे स्वरूप असणार आहे. शेतीशी, ग्रामीण भागाशी ज्यांचा संबंध आहे, त्यांना शेतीच्या क्षेत्रात होत असलेले बदल नक्कीच दिसले असतील. तंत्रज्ञानाच्या प्रभावाने गेल्या अवघ्या वीस वर्षांत शेतीमध्ये अनेक नवे रंग भरले आहेत तर काही ठिकाणी रंग बिघडविले आहेत, हेही त्यांनी पाहिले असेल. सध्या शेतीमध्ये जे तंत्रज्ञान दिसून येत आहे, जे संशोधन सुरू आहे, ते पाहता असे वाटते की येत्या एक-दोन दशकांत शेती, बागायती, पशुपालन आणि शेतीपूरक व्यवसायांमध्ये कायापालट झाल्याचे पाहायला मिळेल.

भविष्यात शेतीच्या एका युनिटमध्ये एक छोटे शेत, काही झाडांची बाग, मध्यम आकाराचा एखादा तलाव, आठ-दहा पशूंचा एखादा कळप यांचा समावेश असेल. याच युनिटचे विशाल रूपही काही ठिकाणी पाहायला मिळेल. शेतीचे नियोजन आणि नियंत्रण यासाठी संगणक, खास सॉफ्टवेअर, सेन्सर लावलेली वेगवेगळी उपकरणे अ‍ॅग्री रोबो किंवा फार्म रोबो, अ‍ॅग्रीबोट, मायक्रोबोट असा सगळा ताफा शेतात तैनात असेल. सेन्सर, यांत्रिक रोबो, संगणक, सॉफ्टवेअर आणि इंटरनेट या सर्वांच्या मिलाफातून एक अशी स्वयंचलित प्रणाली उभी राहील, ज्यात शेतकर्‍याचा हस्तक्षेप अत्यंत मर्यादित स्वरूपाचा असेल. शेतीतील सुरुवातीपासून शेवटापर्यंतच्या सर्व प्रक्रिया करण्यास ही प्रणाली सक्षम असेल.

शास्त्रज्ञांनी अनेक प्रकारचे सेन्सर आणि त्यावर चालणारी उपकरणे विकसित केली आहेत. हे सेन्सर पाणी, जमीन, हवा, झाडे आणि रोपांचे नमुने घेऊन त्यांच्या तत्कालीन स्थितीचा अंदाज घेण्यासाठी उपयुक्त आकडेवारी उपलब्ध करून देऊ शकतील. या प्रणालीतून प्राप्त झालेल्या आकडेवारीद्वारे शेत, जंगल, बाग, तलाव आदींच्या बाबतीत प्रत्येक क्षणाची स्थिती जाणून घेता येईल. आर्द्रता, तापमान, खत आणि पाण्याची मात्रा, जैविक रसायने, खनिजांचे प्रमाण या सर्व बाबतीत संतुलन कसे आहे, हे समजू शकेल. हे सेन्सर इतके प्रभावी काम करू शकतात, की त्यांच्याकडून एखाद्या झाडाबद्दल किंवा रोपांच्या एखाद्या समूहाबद्दल वेगवेगळी माहितीसुद्धा पाहिजे असल्यास मिळू शकते.

शेत छोटे असल्यास हे सेन्सर हातात घेऊन स्थितीचा अंदाज घेता येतो, तर मोठ्या शेतात ड्रोनच्या साह्याने सेन्सरद्वारे पाहणी आणि अंदाज घेण्याचे काम करता येईल. कोणत्या ठिकाणी खताची किंवा पाण्याची गरज आहे आणि कुठे ते अधिक झाले आहे, याची माहिती हे सेन्सर देतील. शेतकर्‍याच्या ट्रॅक्टरचा एखादा सुटा भाग जुना झाला असेल, झिजला असेल किंवा त्यात आणखी कोणतीही खराबी आली असेल, तर आगामी काळात ट्रॅक्टर स्वतःच शेतकर्‍याला एसएमएस पाठवेल. ट्रॅक्टर जर शेतीकामासाठी योग्य राहिला नसेल, तरीसुद्धा तशी सूचना तो मालकाला देईल.

\त्याचप्रमाणे लाइव्हस्टॉक बायोमेट्रिक्सच्या माध्यमातून गाई-म्हशींच्या गळ्यात बांधल्या जाणार्‍या पट्ट्यातूनच त्यांच्या शारीरिक स्थितीचे अपडेट्स शेतकर्‍याला मिळत राहतील.थोडक्यात, तंत्रज्ञान आगामी काळात शेतीचा आणि शेतीपूरक व्यवसायांचा चेहरामोहरा बदलून टाकणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com