टिक-टॉक वापरकर्त्यांसाठी गुड न्यूज
गॅजेट

टिक-टॉक वापरकर्त्यांसाठी गुड न्यूज

भारतात हे ॲप पुन्हा सुरू होण्याची शक्यता

Rajendra Patil

न्यूयॉर्क - New York

टिक-टॉक वापरकर्त्यांसाठी ही आनंदाची बातमी असून भारतात हे अ‍ॅप पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक सल्लागाराने केलेले भाकीत खरे ठरले, तर काही दिवसांमध्येच देशात टिक-टॉक पुन्हा सुरू होऊ शकते.

लॅरी कुडलो हे ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार आहेत. टिक-टॉक कंपनी आपला चिनी शेअर बंद करून, पूर्णपणे अमेरिकन कंपनी होऊ शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. हे खरे ठरल्यास, टिक-टॉक ही कंपनी चीनशी बांधिल नसेल.

टिक-टॉक आपल्या मालक कंपन्यांमधून चिनी कंपनीला काढून टाकेल आणि स्वतंत्र अमेरिकी कंपनी म्हणून कार्यरत राहील, असे कुडलो यांनी पत्रकारांना सांगितले.

चिनी सरकारच्या कायद्यानुसार, चिनी कंपन्यांना आपल्या सरकारला हवी ती माहिती, हवी तेव्हा देणे बंधनकारक असते. त्यामुळे, चिनी अ‍ॅप्सच्या माध्यमातून देशातील माहिती चिनी सरकारला मिळणे सहज शक्य होते. देशाच्या सार्वभौमत्वाला आणि नागरिकांच्या गोपनीयतेला यामुळे धोका निर्माण होतो आहे, हे लक्षात आल्यानंतर भारत सरकारने 56 चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणली होती. यात टिक-टॉकचाही समावेश होता.

चीननंतर, टिक-टॉकची सर्वात मोठी बाजारपेठ भारत होती. त्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर अमेरिका होती. भारतानंतर ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकाही टिक-टॉकवर बंदी आणण्याचा विचार करत होते. त्यामुळे, टिक-टॉक हा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com