व्हिडिओ गेम खेळणे लाभदायक
गॅजेट

व्हिडिओ गेम खेळणे लाभदायक

व्हिडिओ गेम खेळण्याने मुलांची एकाग्रता वाढते

Ramsing Pardeshi

जुन्या पिढीतला प्रत्येकच माणूस नव्या पिढीवर सातत्याने टीकाच करत असतो. आजच्या पिढीला खेळायला नको. वाचायला नको. केवळ स्मार्ट फोन हातात धरून सोशल मीडियावर सरफंग करत राहणे हाच त्यांचा धंदा झालेला आहे.

विशेषत: लहान मुले टीव्ही किंवा कॉम्प्युटरसमोर बसून कार्टुन पहात असतात किंवा व्हिडिओ गेम खेळत असतात तेव्हा तर जुन्या पिढीतल्या लोकांचा राग भलताच अनावर होतो.

परंतु व्हिडिओ गेम खेळणे हे घातक नसून अधिक फायद्याचे आहे असे संशोधन आता पुढे आले आहे. व्हिडिओ गेम खेळण्याने मुलांची एकाग्रता वाढते असे काही शास्त्रज्ञांना आढळले आहे.

अमेरिकेतल्या विविध संस्थांमधील शास्त्रज्ञांनी या संबंधात जवळपास १०० सर्व्हेक्षणे केली आहेत. त्यात त्यांना असे दिसून आले आहे की आपल्या मेंदूतील ज्या भागामध्ये त्रिकोण, चौकोन, पिरॅमिड यातील फरक स्पष्टपणे आकलन होण्याचे कौशल्य समाविष्ट असते तो मेंदूचा भाग व्हिडिओ गेम खेळल्याने अधिक सक्षम होतो. अशाच प्रकारचा एक अभ्यास स्पेनमध्ये करण्यात आला आहे.

माणसाची एकाग्रता किंवा एखाद्या गोष्टीचे अवधान हे फार महत्त्वाचे असते. मात्र अवधानाचेसुध्दा काही प्रकार असतात. त्या सगळ्या प्रकारांची वाढ व्हिडिओ गेम खेळण्याने होते. शिवाय अशा प्रकारची कौशल्ये अंतर्भूत असलेल्या मेंदूच्या त्या विशिष्ट भागाचा आकार सुध्दा व्हिडिओ गेम खेळण्याने वाढतो.

फ्रंटिअर्स इन ह्युमन न्यूरो सायन्स या मासिकामध्ये व्हिडिओ गेमच्या बाबतीत करण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिध्द करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारच्या १२२ चाचण्यांचे हे निष्कर्ष आहेत. त्यातील १०० चाचण्या या मेंदुतील क्रियाकलापांच्या संबंधातील आहेत. तर २२ चाचण्या मेंदूमध्ये होणार्‍या बदलाशी संबंधित आहेत. असे सारे फायदे दिसत असले तरी या खेळांचे काही दुष्परिणामसुध्दा आहेत.

त्यानुसार एकदा एखाद्या मुलाला व्हिडिओ गेम खेळण्याचा नाद लागला की तो त्या खेळाच्या आहारी जाण्याची शक्यता असते आणि त्यातूनच काही शारीरिक समस्या निर्माण होतात. जाडी वाढणे आणि दृष्टी मंदावण हे दोन दुष्परिणाम तर ठळकपणे दिसून आलेले आहेत.

काही मुलांच्यामध्ये काही मानसिक समस्या निर्माण झालेल्या दिसून आल्या आहेत. तेव्हा व्हिडिओ गेम खेळण्याचे जसे काही फायदे आहेत तसेच काही तोटे सुध्दा आहेत. त्यामुळे हे गेम तारतम्यानेच खेळले पाहिजेत.

Deshdoot
www.deshdoot.com