अतिप्राचीन काळापासून मानव शक्तीची उपासना करत आला आहे. शनिवार (दिनांक १७) पासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. करोनामुळे या वर्षी यात्रा रद्द आहेत, उत्सव सुध्दा नाही. परंतु मंदिरात धार्मिक कार्यक्रम नित्यनियामाने होणार आहेत. या कार्यक्रमांना भाविकांना येता येणार नाही. ऑनलाईन दर्शनाचा लाभ अनेक मंदिरांनी करुन दिला आहे. नवरात्रोत्सवासाच्या निमित्ताने नाशिक शहरातील प्रसिद्ध देवीस्थानांची माहिती...

श्रीकालिका मंदिर

नाशिकमधील श्री कालिका देवी मंदिर हे जागृत देवस्थान आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी १७०५ च्या सुमारास केला. त्यांनी बांधलेले दगडी मंदिर दहा बाय दहा फूट लांबीचे व पंधरा फूट उंचीचे होते. तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांनी २० डिसेंबर १९७४ रोजी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन केले. त्यानंतर बरोबर सहा वर्षांनी १९८० साली हल्ली आग्रारोडवर दिमाखात उभे असलेले श्रीकालिका देवीचे कलाकुसरीने नटलेले विशाल मंदिर व सभामंडप तयार झाले.

ग्रामदैवत : भद्रकाली मंदिर

नाशिकमधील भद्रकाली मंदिर हे मूळ ग्रामदैवत मानले जाते. देवीच्या ५१ शक्तिपीठांपैकी हे एक मानले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरास शिखर व कळस नाही. या ठिकाणी नवदुर्गाची मूर्ती असून, मध्यभागी भद्रकालीची उंच मूर्ती आहे. लाकडी खांब असलेल्या या मंदिरातील पूजेला विशेष महत्त्व आहे.

सांडव्याचे मंदिर

गोदावरीच्या पात्रात नारोशंकराच्या मंदिराला लागूनच सांडव्यावरच्या देवीचे मंदिर आहे. सांडव्यावरची देवी ही साक्षात गडावरची सप्तशृंग निवासिनीच आहे. त्यामुळे येथील देवीची मूर्ती हुबेहूब सप्तशृंगी गडावरील देवीसारखीच आहे. ज्या ठिकाणी देवीचे मंदिर आहे तेथे पूर्वी पाण्याचा एक सांडवा होता. या सांडव्यावरून गोदावरीचे पाणी वाहू लागले की जाणे-येणे बंद होत असे. इतर वेळी ये-जा करण्यासाठी लोक या सांडव्याचा उपयोग करीत असत. देवी मंदिराच्या जवळच हा सांडवा असल्यामुळे या देवीला ‘सांडव्यावरची देवी’ असे नाव पडले.

तांबट गल्लीतील कालीका देवीचे मंदिर

अशोक स्तंभाजबळ तांबट गल्लीतील दक्षिण मुखी देवीची मंदिर आहे. तांबट परिवारातील व्यक्तीच्या स्वप्नात देवी आली. त्यानंतर विहिरीतून बाहेर काढून देवीची स्थापना केली. हळूहळू मंदिराचे बांधकाम सुरु केले. सुमारे ३५० वर्षापुर्वी या मंदिराची स्थापना झाली. मंदिराच्या घंटास १६८ वर्ष झाली आहे. कालीका देवीची मुर्ती कुमारकी स्वरुपातील आहे. दरवर्षी नवरात्रोत्सावात मोठा उत्सव असतो. यावर्षी मात्र फक्त धार्मिक कार्यक्रम नियमित होणार आहे. कोजागिरी पोर्णिमेस गोंधळाचा मोठा कार्यक्रम असतो.

रेणुका देवी, गाडगीळ लेन

गाडगीळ परिवार दरवर्षी चांदवडला जाऊन रेणुका देवींचे दर्शन घेत होते. एका वर्षी ते आजारी पडल्यामुळे जाऊ शकले नाही. त्या दिवशी मग देवीने त्यांना दर्शन दिले. त्यामुळे १२५ वर्षांपुर्वी देवीचे हे मंदिर बांधले गेले.