राजमाता जिजाऊ : दिव्य शक्तीचे एक देखणे रूप!

jalgaon-digital
3 Min Read

आपल्या मातीच्या स्वाभीमानासाठी अन् अभिमानासाठी शेतकर्‍यांसाठी, कष्टकर्‍यांसाठी लढणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज अन् छत्रपती संभाजीराजे यांना घडविणार्‍या राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचा आज जन्मोत्सव. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जाणून घेऊया जिजाऊ यांचं जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा बद्दल..

राजमाता जिजाऊ यांचा जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. आज हे स्थळ केवळ ऐतिहासिक स्थळ नाही तर एक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखल्या जाते.

जिजाऊ माँसाहेबांचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये १२ जानेवारी १५९८ साली झाला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर हायवेला लागुनच आहे. याच वस्तूसमोर नगर पालिका निर्मित एक बगिचा देखील आहे.

येथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे. ही भव्य वस्तू भारतातील संपूर्ण हिंदुराज्यांच्या समाधीपेक्षा मोठी वस्तू आहे. ज्या ठिकाणी जिजाऊंनी रंग खेळला तो महाल म्हणजे रंगमहाल. याच महालात शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची बोलणी करण्यात आली होती.

येथे नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे, या मंदिरामध्ये संपूर्ण पाषाणातून साकारलेले हरीहाराचे सुंदर शिल्प आहे, तर राजे लखुजीराव जाधवांनी मंदिराचे पुर्नजीवन केल्याचा शिलालेख कोरलेला आहे.

या मंदिरासमोरच चौकोनी आकारात तळापर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असणारी एक भव्य बारव आहे. तर ८व्या ते १० व्या शतकातील अतिप्राचीन असे हेमाडपंथी रामेश्वर मंदिर आहे.

राजेराव जगदेवराव जाधवांच्या कार्यकाळात भव्य किल्यांच्या निर्मितीची सुरवात झाली होती त्याचचं एक सुंदर उदाहरण म्हणजे काळाकोठ. अतिभव्य आणि मजबूत अशा या काळाकोठच्या भिंती २० फुट रुंद आणि तेवढ्याच उंच आहेत. यासोबतच साकरवाडा नावाचा ४० फुट उंच भिंतीचा परकोट येथे बघायला मिळतो, त्या परकोटावर निगराणीसाठी अंतर्गत रस्ता, आतमध्ये विहीर, भुयारी तळघरे, भुयारी मार्ग आहेत. तर या वस्तूचे प्रवेशद्वार देखील अतिसुंदर आहे.

मोतीतलाव म्हणजे सिंचनासाठी पाणी सोडण्याची अति सुव्यवस्थीत आणि त्या काळातील जल अभियांत्रीकीचा अतिउत्कृष्ट नमुना. या तलावाच्या समोरील भाग एका किल्ल्याप्रमाणे बांधण्यात आला असून, विलोभनीय असा परिसर याला लाभला आहे. मोतीतलावाबरोबरच चांदणी तलाव हे देखील एक प्रेक्षणीय स्थळ आहे. तलावाच्या मधोमध तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे.

या परिसरात अतिशय रेखीव पद्धतीने बांधण्यात आलेली पुतळाबारव आहे. ही म्हणजे असंख्य मूर्ती व शिल्पांचा एकत्र वापर करून बनविलेली देखणी शिल्पकृती. तसेच येथे एक सजनाबाई विहीर आहे, त्या काळी या विहिरीतून गावामध्ये पाणी पुरवठा भुमिगत बंधिस्त नाल्यांच्या द्वारे केल्या जात होत्या, या विहरीत आतपर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची सुविधा देखील आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *