Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद शहरातील देवींचे मंदिरे

औरंगाबाद शहरातील देवींचे मंदिरे

संदीप तीर्थपुरीकर

औरंगाबाद – Aurangabad

- Advertisement -

कोरोना संसर्गकाळात आज आपण अनलॉक ५ च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत सणवार साजरे करणार आहोत. दरवर्षीप्रमाणे नवरात्रीच्या काळात मंदिरांमध्ये होणाऱ्या  भक्तांच्या गर्दीला यंदा ब्रेक लागले आहे. भलेही देवीच्या विविध मंदिरांमध्ये केवळ पूजाअर्चा आणि आरती केली जात असली तरी भक्त मनोभावे घरच्या घरी भक्तिभावाने नवरात्रोत्सव साजरा करत आहेत. कोरोनामुळे एकाही ठिकाणी रास दांडिया अर्थात गरबा होत नसला तरी परिस्थितीची जाण प्रत्येकाला आहे. कोणत्याही परिस्थितीत दोन फुटाचे अंतर ठेवत, मास्क लावून, वारंवार हात धुणे व सॅनीटायझरचा वापर करण्याचा संकल्प सर्वजण सिद्धीस नेत आहोत. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, कारण नसताना घराबाहेर पडणे सर्वांनी टाळणे तितकेच गरजेचे आहे.

शहरातील विविध देवीच्या मंदिराविषयी…

ग्रामदेवता कर्णपुरा देवी

शहराची ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्णपुरा देवीचा वार्षिक नवरात्रीचा उत्सव यंदा कोरोना संसर्गकाळामुळे रद्द करण्यात आला आहे. याठिकाणी दररोज देवीची नियमित पूजा व आरती सुरू असली तरी भाविकांना दर्शनासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. असे असले तरी कर्णपुरा येथे कर्णिका देवी मंदिरात रोषणाई आणि सजावट करण्यात आली आहे. दरवर्षीचा उत्साह आणि वर्दळ नसल्याने या यात्रेवर अवलंबून असलेल्या हंगामी व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. दरवर्षी दहा दिवस कर्णपुरा मैदानावर मोठी यात्रा भरते. लोकाग्रहास्तव ही यात्रा पुढे आणखी चार पाच दिवस यात्रेतील दुकाने चालूच राहतात. या यात्रेला देशभरातील व्यावसायिक येतात. रहाटपाळणे, खेळणीची दुकाने, प्रसादाची दुकाने, संसारोपयोगी वस्तू, मनोरंजनाची साधने अशा अनेक दुकानांनी परिसर गजबजलेला असतो.

छावणी परिसरातील कर्णपुरा देवी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. शहराची ग्रामदेवता म्हणूनही कर्णिका देवीची ओळख आहे. नवरात्रोत्सवात लाखो भाविक कर्णिका देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. बिकानेरच्या कर्णसिंग राजाने मंदिराची उभारणी केली होती. कर्णसिंग १८३५ मध्ये शहरात वास्तव्यासाठी आले होते. कर्णसिंग राजस्थानातील कर्णिका मातेचे भक्त होते. त्यांचे वास्तव्य असलेल्या छावणी परिसरात मातेचे मंदिर बांधले.

राजस्थानी शैलीतील या मंदिराचा १९८२ मध्ये जिर्णोद्धार करण्यात आला. कर्णसिंग यांचे या परिसरात वास्तव्य असल्याने परिसराला कर्णपुरा नाव मिळाले. सध्या दानवे कुटुंबिय मंदिराचे पुजारी आहे. त्यांची सातवी पिढी पुजारी म्हणून काम पाहत आहे. कर्णपुरा परिसरातील बालाजी मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, हनुमान मंदिरात ही भाविकांची दर्शनासाठी वर्दळ असते. सध्या मंदिरे बंद असून करोनाच्या काळात खबरादारी म्हणून गर्दी टाळली जात आहे.

हर्सूलची हरसिद्धी माता

औरंगाबाद शहराच्या उत्तरेला हर्सूल हे गाव असून आता हे गाव शहर हद्दीतच आले आहे. याठिकाणी हरसिद्धी देवीचे मंदिर असून या मातेची मनोभावे आराधना केली तर सर्व इच्छा पूर्ण होते अशी मान्यता आहे. हर्सूलमधील हे मंदिर म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचेच ठाणे समजले जाते. या मंदिराचा परिसर पाच एकरांपेक्षाही जास्त असून तेथे पुरातन मंदिरांचे संकुलच आहे. यात हरसिद्धी मातेचे मंदिर फक्त सुस्थितीत आहे. काळ्या पाषाणात देवीची तीन ते साडेतीन फूट उंचीची मूर्ती विलोभनीय आहे.

देवीचे मंदिर छोटे असले तरी ते हेमाडपंती असल्याने त्याचे सौंदर्य व मजबुती काही औरच आहे. या मंदिरात देवीच्या पायथ्याशी महादेवाची पिंड आहे. मंदिरासमोर छोटेसे पाण्याचे कुंड असून त्याच्यावरच नंदीची सुंदर मूर्ती लक्ष वेधून घेते. त्यामागे प्रभू श्रीरामचंद्राचे छोटेसे मंदिर आहे. या मंदिराच्या डाव्या बाजूला बालाजी अन् लक्ष्मीमातेचे मंदिर आहे तर उजव्या बाजूला दत्ताचे मंदिर आहे. हे मंदिर मात्र अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. समोरच आणखी एक पाण्याचे कुंड आहे. त्याच्या बाजूला पाताळेश्वर महादेव मंदिर आहे. याठिकाणी जमिनीखाली पाण्याचा झरा आहे. त्यामुळे वर्षभर ही महादेवाची पिंड पाण्याखालीच असते. त्याच्या पुढे रेणुकामातेचे प्राचीन मंदिर असून याची रचनाही अगदी हरसिद्धी मंदिराप्रमाणेच आहे. येथेही देवीच्या पायथ्याशी महादेवाची पिंड आहे.

राजा विक्रमादित्य संस्थापक सन ११११ साली तत्कालीन खडकी येथे कामानिमित्त आले होते. त्याकाळी दिल्लीगेटमधून प्रवेश करावा लागत असे. परंतु, ते रात्री बंद होत असल्याने विक्रमादित्य राजास हर्सूलमध्ये मुक्काम ठोकावा लागला होता. त्यांना हा परिसर अधिकच भावल्याने येथे मंदिर बांधण्याचा निश्चय त्यांनी केला व हरसिद्धीमाता येथे विराजमान झाली, असा इतिहास सांगितला जातो. चंद्रकुंडाने १९७२ च्या दुष्काळात संपूर्ण हर्सूलगावाची तहान भागविली होती. कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी गुरुनानक जयंतीला येथे हरसिद्धीमातेची मोठी यात्रा भरते, ज्यात शीख समाजाचाही सहभाग असतो. दरवर्षी नवरात्रात या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. यंदा कोरोना संसर्गकाळामुळे मंदिरे बंद ठेवण्यात आल्याने आलेले भाविक बाहेरूनच दर्शन घेऊन परतत असल्याचे पाहायला मिळते.

लासूर गावचे ग्रामदैवत श्री दाक्षायणी देवी

औरंगाबादपासून तासभराच्या अंतरावर आलेल्या लासूर गावात शिवना नदीच्या काठावर दाक्षायणी देवीचे भव्य मंदिर वसलेले आहे. ही देवी लासूर गावचं आराध्य दैवत आणि वैजापूर तालुक्याचेही ग्रामदैवत आहे. प्रसन्न मूर्ती, आकर्षित करणारी रोषणाई, डोक्यावर चांदीचा मुकुट आणि अंगभर दागिन्यांनी नटलेली ही देवी दाक्षायणी दक्ष राजाची कन्या आहे. देशात ही एकमेव देवी आहे जिचे पीठ या गावाखेरीज कुठेही नाही. त्यामुळे देशभरातले भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात.

वर्षातून दोन वेळा गावात मोठा उत्सव पार पडतो. एप्रिल-मे महिन्यात मोठी यात्रा आणि नवरात्रीत नऊ दिवस मंदिर भक्तांनी गजबजलेले असते. वैजापूर तालुक्यातल्या नववधूंसाठी दाक्षायणीचा आशीर्वाद ही लग्न समारंभातलीच एक प्रथा आहे. गावागावातल्या नववधू देवीचा आशीर्वाद घेऊन आपल्या सुखी संसाराला सुरुवात करतात, हे या ग्रामदैवतेचे एक आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे. गावातील देवीच्या मंदिराचे बांधकाम पूर्वी हेमाडपंथी होते.

कालांतराने मंदिराचं रूपही बदलले. देवीच्या मंदिरासमोर एक दीपमाळ आहे. त्यावर कोरलेल्या वाघाच्या मूर्ती सर्वांचे लक्ष्य वेधून घेतात. मंदिराच्या मध्यभागी छतावर कोरलेले सुदंर कमळ, मंदिरावरील नक्षीकाम देखणं आणि सुंदर आहे. त्यामुळं एक वेगळीच प्रसन्नता याठिकाणी अनुभवायला मिळते. पावसाळ्यात शिवना नदी दुथडीभरून वाहते. तेव्हा पाण्यातून पायीपायी भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. या मंदिराला एक मुख्य कळस आणि तीन उपकळस असलेलं हे मंदिर गावाच्या प्रत्येक कोपऱ्यातून नजरेस पडते.

रेणुका माता मंदिर

सिडको बसस्थानकाकडून हर्सूल टी पॉईंटकडे जाणाऱ्या जळगाव रोडवरील रेणुका माता मंदिर शहरवासीयांसाठीच नव्हे तर आसपासच्या लाखो भाविकांसाठी मानाचे ठिकाण आहे. साधारणपणे १९८३-८४ च्या सुमारास झाली आणि १९८४ च्या चैत्र शुद्ध पोर्णिमा या दिवशी श्री रेणुका माता मंदिर अस्तित्वात आले. एन-९, एल-सेक्टर येथे असलेले हे मंदिर नवरात्रीच्या काळात विविध रंगांच्या रोषणाईने झगमगते.

कोर्टाची देवी

शहरातील कर्णपुऱ्यातील तुळजाभवानीप्रमाणेच केशरसिंगपुऱ्यातील रेणुका माता मंदिर आहे. पूर्वी केशरसिंग आणि कर्णसिंग राजे होऊन गेले. त्यांच्या नावावरूनच केशरसिंगपुरा आणि कर्णपुरा नाव पडले. केशरसिंगपुर्यातील रेणूका माता मंदिर आता कोर्टाची देवी मंदिर या नावाने ओळखले जाते. मंदिराच्या आवारात प्रवेश करताच केशरीनाथ शिव मंदिर, चिंतामणी गणपती मंदिर, विठ्ठल रूक्मिणी मंदिर ,हनुमान मंदिर, कालभैरव मंदिर ओळीने बांधली आहेत. असे म्हणतात, इथे पूर्वीपासूनच देवी विराजमान होती. नवरात्रोत्सवात पूजा, आरती या धार्मिक विधींसह भजनाचा कार्यक्रम होतो. नवरात्रीसह वर्षभर भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. कोरोनाकाळामुळे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. परंतु, पूजाअर्चा नियमितपणे होत आहे.

मुकुंदवाडीतील लक्ष्मीदेवी मंदिर

मुकुंदवाडीतील श्रीक्षेत्र लक्ष्मीदेवी मंदिर स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात उभारण्यात आले. येथे दरवर्षी महत्त्वाच्या चार धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. नवरात्र महोत्सव दणक्यात साजरा होतो. परंतु, यंदा कोरोनामुळे सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम नसून केवळ विधिवत पूजा केली जात आहे. मुकुंदवाडीचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात लक्ष्मीदेवी व बालाजीचे एकत्रित दर्शन होते. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाड्यात हैदराबाद निजामाचे राज्य होते. त्यामध्ये औरंगाबाद प्रमुख होते.

देवीची नित्यपूजा, दर्शन व स्मरण आपल्याला व गावातील सर्व मंडळींना व्हावे आणि आठवण राहावी म्हणून चैत्र पौर्णिमा शालिवाहन शके १८१९ म्हणजेच १८९७ साली श्री तुळजाभवानी व श्री सप्तशृंगी देवीची संयुक्त मूर्ती स्वरूपात प्राणप्रतिष्ठा केली. आठ दिवस अखंड पूजा-पाठ करून चैत्र वद्य नवमीला देवीची यात्रा भरवली जाते. या ठिकाणी वर्षातून चार कार्यक्रम प्रामुख्याने साजरे केले जातात. त्यामध्ये श्री देवीची यात्रा व नवरात्रोत्सवचा समावेश असतो. तसेच श्रीकृष्ण जयंती आणि संत शिरोमणी जगद्गुरू रविदासजी महाराजांची जयंती माघ पौर्णिमेला साजरी केली जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या