Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यासप्तश्रृंगी : देशभरातील भाविकांचे श्रध्दास्थान

सप्तश्रृंगी : देशभरातील भाविकांचे श्रध्दास्थान

कळवण / किशोर पगारे

श्री सप्तश्रृंगी गड नाशिकपासून ६० किमी अंतरावर कळवण तालुक्यात नांदुरा गावाजवळ आहे. देवीचे मंदिर ७ शिखरांनी वेढलेले आहे. ‘सप्तश्रृंग’ या शब्दाचा अर्थ ‘सातशिखरे’ असा आहे. समुद्र सपाटीपासुन ४६५९ फुट उंचीवर आहे.

- Advertisement -

पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते अर्धे पीठ आहे, अशी मान्यता आहे. बाकीची तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका. १८ हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात.

आदिशक्तीचे मूळ स्थान

अनेक कुटुंबांची कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते. या ठिकाणी माता भगवती निवास करते.

मुर्ती पाषाणात कोरलेली

देवीची आठ फुट उंचीची मुर्ती पाषाणात कोरलेली असून दोन्ही बाजूस ९ असे एकुण १८ हात व त्यात विविध आयुधे असलेली आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते.

देवीला अकरा वार साडी

देवीला अकरा वार साडी लागते व चोळीला तीन खण लागतात. डोक्‍यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे. कमरपट्टा, पायात तोडे, असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात.

राम-सीतेने घेतले होते दर्शन

दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले.

सप्तशृंग म्हणचे द्रोणागिरीचा काही भाग

महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला. त्या वेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय.

शिवाजी महाराजांनी घेतले दर्शन

सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरींमध्ये नोंदवलेला आढळतो.

गडावर ४७२ पायऱ्या

देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने ४७२ पायऱ्या आहेत. चढणीचा मार्ग असून, दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने परतीचा मार्ग आहे. हे दोन्ही मार्ग पायऱ्यांचे आहेत. २०१८ पासून रज्जूमार्गाचा वापर सुरू झाला आहे.

गडाच्या शिखरावर औषधी वनस्पती

गडाच्या शिखरावर विविध औषधी वनस्पती आढळतात. गडावर कालीकुंड, सुर्यकुंड, दत्तात्राय कुंड अशी कुंड आहेत. गडाच्या पुर्वीस खोल दरीने विभागला गेलेला ‘’मार्कंडेय डोंगर’’ आहे. या ठिकाणी ऋषी मार्कंडेय यांचे वास्तव्य होते, असे मानले जाते.या ठिकाणी त्यांनी दुर्गासप्तशतीची रचना केली. चैत्र व अश्विन नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते.गडाच्या पायथ्याशी नांदुरी गाव आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या