Friday, April 26, 2024
HomeUncategorizedधुळे येथील आदीशक्ती एकवीरा देवी

धुळे येथील आदीशक्ती एकवीरा देवी

धुळे – Dhule

शहरातील पांझरा नदीच्या काठावर खान्देश कुलस्वामीनी आदिशक्ती एकविरा मातेचे मंदीर आहे. या मंदिराला सुमारे 400 वर्षाचा इतिहास आहे.

- Advertisement -

250 कुळांची कुलस्वामीनी असलेल्या श्री एकवीरा देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सतत भक्तांची मांदियाळी असते. आज नवरात्रौत्सवाला प्रारंभ होतो आहे. त्यामुळे अर्थातच सात महिन्यानंतर आता मंदिरात भक्तांची रेलचेल जाणवणार आहे.

भक्तांसाठी सुमारे 35 लाख रूपये खर्चून 18 फूट उंचीचा भव्य पितळी धातूपासून रथ बनविण्याचे काम ट्रस्टने पुर्ण केले आहे. सुमारे 400 वर्षाचा इतिहास असलेल्या या मंदिराचा पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जीर्णोध्दार केलेला आहे. देवीचे भक्तगण खान्देश, संपूर्ण महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजराथ, छत्तीसगड, कर्नाटक तसेच संपूर्ण भारतात पसरलेले आहेत. त्याचप्रमाणे काही भाविक नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने परदेशातदेखील आहेत.

चैत्र व अश्विनी या दोन महिन्यात दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे चैत्र महिन्यातील उत्सव केवळ पुजापाठ पुरताच साजरा करण्यात आला. प्रत्येक महिन्याच्या चावदसच्या दिवशी (अमावस्येच्या आदल्या दिवशी) श्री एकवीरा देवीचे मंगलस्नान व प्रत्येक पौर्णिमेस मंदिर परिसरात श्री एकविरा देवी पालखी सोहळ्याचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.

सदर मंदिरावर अनेक उपक्रम सामाजिक व धार्मिक कार्यक्रम होत असतात. या विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविक देश-परदेशातून हजेरी लावत असतात. चैत्र नवरात्र उत्सव कालावधीत धुळे शहरात पारंपारिक मार्गाने पालखी सोहळ्याचे आयोजन करून शोभायात्रा काढण्यात येते. चैत्र महिन्यातील नवरात्र उत्सवात श्री एकवीरा देवीची शोभायात्रा रथातून काढण्यात यावी, अशी भाविकांकडून सातत्याने मागणी होत आहे. ट्रस्टचा देखील भव्य असा नक्षीदार रथ बनविण्याचा अनेक वर्षापासून संकल्प पुर्ण केला आहे.

श्री एकविरा देवीची शोभायात्रा काढण्यासाठी 18 फुट उंचीचा संपूर्ण पितळी धातुचा दोन घोडे, इष्ट देवी – देवतांच्या मूर्ती असलेला पाच टन वजनाचा अष्टकोनी नक्षीदार असा रथ तयार झाला आहे. रथ बनविण्याचे काम दक्षिण भारतातील कुंभोकोनम या गावी श्रीराम हॅण्डीक्राफ्ट यांना देण्यात आलेले होतेे. त्याचप्रमाणे जुने धुळे येथील श्री रेणुका माता मंदीराची पडझड झाली होती. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम करण्यात आले असून आता पूर्णत्वाकडे आले आहे. श्री एकवीरा देवी व रेणुका माता मंदीर ट्रस्टला शासनाकडून अनुदान मिळत नाही.

भाविकांनी दिलेल्या देणगी व दान मधुनच वर्षभराच्या सर्व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. खान्देश कुलस्वामिनी, आदिमाया, आदिशक्ती श्री एकविरा देवीचे धुळ्यात पांझरा नदीकाठी स्वयंभू स्थान आहे. श्री.एकवीरादेवी मातेचे हे मंदिर पुर्वी हेमाडपंथी होते. श्री. आदिशक्ती एकवीरादेवीची मुर्ती स्वयंभू, अष्टभुजा, शेंदूरलेपन, पुर्वाभिमुख असून पद्यासनी बसलेली आहे.

मूर्तीच्या उजव्या बाजूस श्री गणपती व डाव्या बाजूस तुकाईमातेची चतुर्भुज शेंदूर लेपनाची मूर्ती आहे. साडेचार फुट उंचीच्या दोन मोठ्या समया आहेत. श्री.एकवीरा मातेची मुर्ती पुर्वाभिमुख आहे. चैत्रोत्सव व नवरात्रोत्सवात देवीचा मोठा यात्रोत्सव भरतो. मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टचे कामकाज सुरु असून यंदा कोरोनाशी संबंधित नियम पाळून उत्सव साजरा होणार आहे.

– (सर्व फोटो, गोपाळ कापडणीस, धुळे)

- Advertisment -

ताज्या बातम्या