Friday, April 26, 2024
Homeनाशिकजवान भूषण सानप यांच्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वत्र कौतुक

जवान भूषण सानप यांच्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वत्र कौतुक

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikraod

उत्तराखंडमध्ये ढगफुटीने हाहाकार उडालेल्या डोंगरी भागातील मदतकार्यात वडगाव पिंगळा येथील रहिवासी आणि भारतीय सैन्यातील जवान नायक भूषण खंडेराव सानप यांनी मातेसह दोन मुलींचा जीव वाचवत भूषणावह कामगिरी केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- Advertisement -

चार-पाच दिवसांपूर्वी उत्तराखंडची राजधानी डेहराडूनच्या जवळ असणार्‍या डोंगराळ भागात ढगफुटी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. डोंगर खचल्याने चिखलाच्या ढिगार्‍याखाली अनेक नागरिक दबले गेले. परंतु त्याच वेळेस भारतीय सैन्याच्या तुकडीला मदत कार्यासाठी पाठवण्यात आले. याच तुकडीत जवान नायक भूषण सानप हे कर्तव्यावर होते. एनडीआरएफचे जवान पोहोचेपर्यंत भूषण सानप यांच्यासह त्यांच्या चाळीस सहकार्‍यांनी प्रसंगावधान राखून सुमारे ऐंशी नागरिकांचा जीव वाचवण्यात यश मिळवले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

ज्या ठिकाणी हा प्रसंग घडला; त्या ठिकाणाजवळ वाहणार्‍या नदीने रौद्ररूप धारण केले होते. या नदीत एक महिला आणि तिच्या दोन मुली वाहून जात होत्या. प्रसंगावधान राखून भूषण सानप यांनी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला उडी घेतली आणि लाकडाच्या सहाय्याने त्यांचा जीव वाचवला. पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की, त्यांच्याही जीवाला धोका निर्माण झालेला. परंतु जीवाची पर्वा न करता या जवानाने आपल्या धाडसी वृत्तीने या तिघींना वाचवून आपले ‘भूषण’ हे नाव सार्थ केले. जीव वाचलेल्या तिघींसह त्यांच्या कुटुंबीयांनी साश्रूपूर्ण नयनांनी भूषण यांचेप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

त्यांच्या या धाडसी कामगिरीबद्दल रेजिमेंटच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. स्थानिक प्रशासन आणि वाचलेल्या तिघींच्या परिवाराने त्यांना रोख रक्कम रुपये 1 लाख, 25 हजारांचे बक्षीस दिले. मनाचा मोठेपणा दाखवत कर्तव्यपरायण भूषण सानप यांनी ही रक्कम परिसरातील गरजूंच्या मदतीसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. भूषण सानप यांचे माध्यमिक शिक्षण पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात झालेले आहे. त्यांच्या या धाडसी कामगिरीबद्दल शाळा, ग्रामस्थ आणि आजी-माजी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करून अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या