Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Photo Gallery : फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा; मक्याला फुटले कोंब, उभे पिक क्षणार्धात जमीनदोस्त

Share

खामखेडा | वैभव पवार

गेल्या चार-पाच वर्षांपासून बळीराजाला सतत नापिकीचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेतकरी पुढे शेती करावी की नाही या विवंचनेत सापडला आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळाचा सामना शेतकरी करीत आहेत.

या शेतकऱ्यांना शासनाकडून तोडकी मदत मिळाली.मागील वर्षी सरकाने कर्जमाफीची घोषणा केली मात्र कित्येक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा अद्याप मिळालेला नाही.

अशा परिस्थितीत यावर्षी नैसर्गिक शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक पावसात भिजून मातीमोल झाले. यावर्षी प्रारंभीपासून पावसाच्या दगाबाज धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. संपूर्ण जून व जुलैचा महिना पूर्वार्ध पावसाविना गेला तरीही बळीराजाने मोठ्या कसरतीने पीक तयार केलं होतं.

जुलैच्या शेवटी पाऊस पडायला सुरुवात झाली. दिवाळीच्या तोंडावर शेतातील कापणी योग्य बहुतांश पिकांची कापणी होऊन शेतकऱ्यांनी या पिकांची शेतातच साठवणूक केली होती तर कापणी न झालेल्या शेतकऱ्यांचे पीक यावेळी शेतातच उभे होते.

अशा परिस्थितीत अचानक परतीच्या पावसाने जोरदार बरसणे सुरू केल्यामुळे शेतातील उभे पिक तर खराब झाले आणि कापणी होऊन गंजी लावून ठेवलेले पिक देखील शेतात पाणी साचल्यामुळे भिजले. त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना आपले पिक वाचवायची संधीच मिळाली नाही.

बहुतांश शेतकऱ्यांकडे साठवणुकीचे साधन नाही अशा परिस्थितीत पिकाचे रक्षण कसे करावे असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे सततच्या नापिकीमुळे यापुढे शेती करावी की नाही अशा विवंचनेत शेतकरी अडकला आहे. दुसरीकडे शेती सोडून उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने बळीराजा पार खचून गेला आहे.

गेल्या दहा-पंधरा दिवसापासून सतत दमदार परतीचा पाऊस सुरू असल्याने पिकांची नासाडी झाली आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेत असल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. रात्रंदिवस मेहनत करून पिक उभारणीसाठी हजारो रुपये खर्चून हातात मात्र काही येत नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. निसर्गाबरोबर शासनाने सुध्दा शेतकऱ्यांकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. मका,बाजरी,सोयाबीन,ज्वारी, या पिकांना पूर्णपणे कोंब फुटल्याने हे पिके शेतकऱ्यांच्या हातातुन गेले आहेत.

परतीच्या पावसाने बळीराजा पुरता उद्धवस्त झाल्याचे चित्र असून जगाच्या पोशिंद्यासमोरच आता पोटापाण्याचा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.या विदारक,चिंतनीय परिस्थितून बळीराजाला बाहेर काढण्यासाठी शासनस्तरावरून भरीव मदतीचा हात मिळणे गरजेचे आहे.


परतीच्या पावसानं घातलेल्या हैदोसामुळं शेतकरी बांधव पुरता बेजार झाला आहे. आर्थिक व मानसिक या दोन्हीही बाजूनं तो पुरता खचला असून त्याला पुन्हा उभारी देण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न होणे गरजेचं आहे. बाजरी मका व इतर धान्य पिकांच्या नुकसानपोटी वाजवी नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे

गणेश शेवाळे,शेतकरी खामखेडा


४-५ वर्षापूर्वी झालेल्या गारपीटीच्या जखमा कुठे सावळत नाही तोच यंदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतलेला आहे. सरकारने आता लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून शेतकारयाला धिर देऊन भरीव मदत करावी. सरकार स्थापन व मुख्यमंत्री निवड करण्यात वेळ न दवडता शेतकरयांमागे उभे राहावे.

– स्वप्निल बिरारी, शेतकरी खामखेडा


सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीनी बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी हीच अपेक्षा

प्रवीण मोरे, शेतकरी, खामखेडा


परतीच्या पावसामुळे सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी अशा बहरलेल्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे. या संकाटांमुळे शेतकरी होरपळला जात असून त्वरित नुकसान भरपाई मिळावी.

प्रभाकर शेवाळे-शेतकरी खामखेडा

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!