Photo Gallery : 26/11 हल्लेखोरांविरुद्धच्या लढाईत ‘मिलिंद’ची महत्त्वाची भूमिका

0

नंदुरबार । दि.15 । प्रतिनिधी-काश्मिरमधील बांदीपोर येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या चकमकीत जिल्हयातील बोराळे (ता.शहादा) येथील हवाई दलाचे जवान मिलींद किशोर खैरनार (वय 34) हे शहिद झाले आहेत.

त्यांच्यावर उद्या दि. 12 रोजी सायंकाळी उशिरा बोराळे येथील तापीनदीकिनार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे कुटूंबिय बोराळे येथे दाखल झाले आहेत. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मिलींद खैरनार यांनी महत्वाची भुमिका बजावली होती.

बांदिपोरामधील हाजिन भागात आज पहाटे पावणे पाच वाजेपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु होती. यात दोन दहशतवादी ठार झाले.

मात्र दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना दोन जवानांना वीरमरण आले. यात नंदुरबार जिल्हयातील बोराळा (ता.शहादा) येथील मिलिंद किशोर खैरनार (वय 34) हे शहिद झाले आहेत. कै.खैरनार हे हवाई दलाच्या ‘गरुड’ या विशेष पथकात कार्यरत होते.

कौटूंबिक पार्श्वभुमी
या हल्ल्यातील शहिद मिलींद खैरनार हे मुळचे नंदुरबार जिल्हयातील शहादा तालुक्यातील बोराळे येथील रहिवासी होते. त्यांचे रिंकू हे टोपण नाव होते. त्यांचे वडील किशोर सदाशिव खैरनार हे साक्री येथील 132 के.व्ही. वीज उपकेंद्रात ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. त्यामुळे ते साक्री येथे स्थायिक झाले होते. परंतू चार वर्षापुर्वी ते सेवेतून निवृत्त झाल्यानंतर नाशिक येथे स्थायिक झाले आहेत. त्यांचा भाऊ मनोज खैरनार हा मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत आहे. त्यांचे आजोबा सदाशिव रामा शिंपी हे प्राथमिक शिक्षक म्हणून रनाळे ता.नंदुरबार येथे कार्यरत होते. त्यांचे काका तुकाराम सदाशिव खैरनार हे सेवानिवृत्त पोस्टमास्टर असून ते कुटूंबासह बोराळे येथे राहतात. कै.खैरनार यांच्या पश्चात पत्नी हर्षदा (वय 30), कन्या कु.वेदीका (वय 4), मुलगा कृष्ण (वय 2) असा परिवार आहे.

शिक्षण व सेवा
शहिद मिलींद खैरनार यांचे पहिली व दुसरीपर्यंतचे शिक्षण दहिवेल ता.साक्री तर पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण साक्री येथे झाले. त्यानंतर वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाचे शिक्षण धुळे येथे झाले. त्यांना हवाई दलात जाण्याची इच्छा असल्याने त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले. दि. 16 डिसेंबर 2002 रोजी ते हवाई दलात दाखल झाले. त्यांचा वीस वर्षाचा बाँड झाला होता. त्यापैकी पंधरा वर्ष सेवा पुर्ण झाली होती. या पंधरा वर्षात त्यांनी दिल्ली, कलाईकोंडा (पश्चिम बंगाल), नळीया (गुजरात), चंदीगढ या ठिकाणी सेवा बजावली. त्यांच्या सेवेचे पाच वर्ष शिल्लक होते. सध्या ते चंदीगढ येथे गरुड या विशेष पथकात कार्यरत होते. परंतू काश्मिरमध्ये सुर असलेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभुमीवर गेल्या दोन महिन्यांपासून ते जम्मू काश्मिरमध्येच कार्यरत होते.

दोन महिने राहूनही मिलींदची भेट नाही
मिलींद हे सध्या चंदीगढ येथे हवाईदलात कार्यरत होते. परंतू गेल्या दोन महिन्यांपासून दहशतवादी कारवाया सुरु असल्याने ते जम्मू-काश्मिर भागात सेवा बजावत होते. याच कालावधीत मिलींद यांचे वडील किशोर खैरनार व आई सुनंदा खैरनार हे चंदीगढला त्यांना भेटण्यासाठी गेले होते. चंदीगढला मिलींद हे पत्नी हर्षदा, मुलगी वेदीका व मुलगा कृष्ण यांच्यासोबत राहत होते. दोन महिने आईवडील चंदीगढला राहिले, परंतू त्यांची एक दिवसही भेट होवू शकली नाही. काल दि.10 ऑक्टोबर रोजी त्यांचे आई-वडील नाशिकला परतले होते आणि आज सकाळीच मिलींद शहिद झाल्याची बातमी त्यांना कळली. त्यामुळे संपुर्ण कुटूंचब हादरले आहे.

26-11च्या हल्ल्यात मिलींदची महत्वाची भुमिका
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत पाकिस्तानी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने हल्ला केला. यात 164 लोक मृत्युमुखी पडले होते तर 308 जण जखमी झाले होते. हॉटेल ताजमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी एनएसजीच्या कमांडोंना पाचारण करण्यात आले होते. या कमांडोंमध्ये मिलींदचाही सहभाग होता. या कमांडोंनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्व दहशतवाद्यांचा खातमा केला होता व शेकडो लोकांचा जीव वाचवला होता.

हवाई दलातील जवान पहिल्यांदाच शहिद
आतापर्यंत देशात झालेल्या अतिरेकी हल्ल्यांमध्ये सैन्यदलातील जवान किंवा अधिकारी शहिद झाले होते. परंतू हवाई दलात कार्यरत असलेला कमांडो प्रथमच शहिद झाला आहे. त्यामुळे बोराळे येथील मुळ रहिवासी असलेल्या या गावावर मिलींदच्या मृत्यूने शोककळा पसरली आहे.

बोराळे गावावर शोककळा
बोराळे हे मुळ गाव असलेल्या हवाई दलातील शहिद मिलींद खैरनार यांच्या हौतात्म्याने बोराळे गाव सुन्न झाले आहे. कै.मिलींद हे सुटीमध्ये या गावी येत असत. त्यांचा गावात मित्र परिवार आहे. त्यांचे काकांचे कुटूंबिय सध्या बोराळे येथे राहतात. त्यांचे आईवडील नाशिकला स्थायिक झाले असले तरी आपल्या मुळ गावी बोराळे येथे त्यांचा कायमचा संपर्क होता. त्यामुळे मिलींदच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे. अवघे गाव त्यांच्या मृत्यूच्या शोकसागरात बुडाले आहे.

तापीनदीच्या काठी अंत्यसंस्कार
कै.मिलींद खैरनार यांचा मृतदेह उद्या दि.12 रोजी सायंकाळी उशिरापर्यंत बोराळे येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय इतमामात तापीपदीच्या किनारी असलेल्या मोकळया जागेवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या पार्श्वभुमीवर आज प्रशासनातर्फे निवासी नायब तहसिलदार गोपाळ पाटील यांनी बोराळे येथे भेट देवून त्यांच्या कुटूंबियांशी चर्चा केली. शासकीय इतमामात होणार्‍या अंत्यसंस्काराची त्यांनी तयारी केली. अंत्यसंस्कार करण्यात येणार असलेल्या परिसरातील काटेरी झुडपे तोडण्यात येवून तेथे मुरुम टाकण्यात आला. जेसीबीच्या साहयाने परिसर स्वच्छ करण्यात आला. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल मोहकर यांनीदेखील भेट दिली.

 

LEAVE A REPLY

*