Photo Gallery : अबालवृध्दांच्या सर्जनशीलतेचा अविष्कार

‘देशदूत’च्या ‘चला जमुनी रंगवूया नाशिक’ उपक्रमास उदंड प्रतिसाद

0

नाशिक : समाजाला अभिप्रेत बांधिलकी प्रमाण मानून शेकडो अबालवृध्दांनी प्रतिभा आणि कल्पनेची सांगड घालत ‘चला जमुनी रंगवूया नाशिक’ उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आपापल्या कुंचल्यातून साकारलेली कला केवळ एक चित्र नाही तर तो सामाजिक अविेष्कार असल्याचा संदेश जणू या कलावंतांनी दिला. तब्बल आठ संकल्पनांवर आधारित हा उपक्रम अवघ्या नाशिक शहरभर चर्चेचा विषय ठरला.

‘देशदूत’द्वारा आयोजित ‘चला जमुनी रंगवूया नाशिक’ उपक्रमास गुंज फाऊंडेशन, मविप्र समाज संस्था आणि सिका या संस्थांचे सहकार्य लाभले. गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालयाची भिंत याअंतर्गत वैविध्यपूर्ण चित्रांनी सजवण्यात आली. सकाळी 9 वाजता सुरू झालेल्या या अध्यायाची सायंकाळी 5 च्या दरम्यान सांगता झाली. या उपक्रमात शहर व परिसरातील सुमारे 50 समुह सहभागी झाले.

यामध्ये विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचाही समावेश राहिला. या उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. मविप्र समाजसंस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमा पवार, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंघल, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप काळे, ‘नावा’चे अध्यक्ष विठ्ठल राजोळे, एस. मार्केटिंगचे प्रमुख जयंत बोडके, गुंज फाऊंडेशनचे संदीप गोयल आदी यावेळी उपस्थित होते. नाशिकच्या सौंदर्यात भर पाडण्याचा ‘देशदूत’चा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन डॉ. सिंघल यांनी यावेळी केले.

विकासाचे नाविन्यपूूर्ण टप्पे गाठणार्‍या नाशिक शहराच्या सौंदर्य वर्धनासाठी अशा सांयुक्तिक उपक्रमांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. ‘देशदूत’चे संचालक संपादक विश्वास देवकर यांनी उपक्रम आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना याआधी गोल्फ क्लब व माई लेले शाळा येथील भिंती रंगवण्याच्या उपक्रमांचा उल्लेख केला. सर्व अतिथींचा ‘देशदूत’च्या वतीने सत्कार करण्यात आला.

या संकल्पना साकारल्या..
1) मुली वाचवा, मुली शिकवा 2) स्त्री सबलीकरण
3) स्त्री सुरक्षितता 4) मुलींची विकास भरारी
5) नाशिकचा वारसा 6) निसर्ग
7) स्मार्ट नाशिक 8) समानता

सकाळपासूनच उत्साह.. : दरम्यान, आपल्या मनातील कलाकृती कुंचल्यातून साकारण्यासाठी उत्सुक असलेल्या कलाकारांनी सकाळी 8 वाजेपासूनच केटीएचएम महाविद्यालय परिसरात गर्दी केली होती. महाविद्यालयाच्या भितीचा प्रत्येकी एक भाग रंगवण्यासाठी वैयक्तिक व समुह श्रेणींमध्ये कलाकारांनी दाखवलेला उत्साह अतिथींच्याही कौतुकाचा भाग ठरला.

 

LEAVE A REPLY

*