इंधन खरेदी बंद; 27 कोटींची उलाढाल ठप्प

0
नाशिक : अपूर्व चंद्रा समितीने केलेल्या शिफारशींची पूर्तता करण्याबाबत दिलेले आश्वासन केंद्र सरकारने अद्याप पाळले नाही. तसेच तेल कंपन्या खर्चाचा पूर्ण परतावा देत नसल्याने त्याविरोधात फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनने (फामपेडा) आज इंधन खरेदी बंद आंदोलन केले.

नाशिक जिल्ह्यातील 350 पेट्रोलपंपांवर आज इंधन खरेदी बंद करण्यात आली. याचा अर्थचक्रावर परिणाम झाला असून सुमारे 27 कोटी रुपयांची उलाढाल यामुळे ठप्प झाली.

कमिशनवाढीसह अपूर्व चंद्रा समितीच्या शिफारसी 1 जानेवारीपासून लागू करण्याचे आश्वासन दिले होते. पाच महिन्यांनंतरही या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतरही बैठका, चर्चा आणि आश्वासन या तीन पातळीवरच पेट्रोल आणि डिझेलपंपचालक लटकत आहेत.

तेल कंपन्यांना दिलेली मुदत मंगळवारी संपल्याने आजपासून पेट्रोल-डिझेल खरेदी थांबवण्यात आली. अपूर्व चंद्र समितीने वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करावी, अशी शिफारस केली होती. त्याबाबत सार्वजनिक तेल कंपनी आणि केंद्र सरकारने लेखी आश्वासन दिलेले नाही.

यामुळे हे आंदोलन करण्यात येणार आहे. नाशिक शहरात 70 पेट्रोलपंप आहेत तर जिल्ह्यात एकूण 350 पेट्रोलपंप आहेत. सरासरी एका पेट्रोलपंपावर 12 हजार लिटरचा एक टँकर याप्रमाणे पुरवठा होतो. जिल्ह्यात 350 पेट्रोलपंप असून खरेदी बंद आंदोलनामुळे इंधन खरेदी आज होऊ शकली नाही.

त्यामुळे सुमारे 27 कोटी 72 लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खरेदी बंद असली तरी पेट्रोलपंपांवर इंधनसाठा असल्याने आंदोलनाचा फारसा परिणाम नागरिकांना जाणवला नाही. काही पेट्रोलपंपचालकांनी अगोदरच टँकर मागवल्याने नागरिकांना याची फारशी झळ बसली नसली तरी सर्वच पेट्रोलपंप चालकांनी आज खरेदी बंद केल्याचे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.

आंदोलन सुरू ठेवू : पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे सचिव विजय ठाकरे यांनी सांगितले, ऑईल कंपन्या खर्चाचा पूर्ण परतावा देत नाहीत. त्याविरोधात टप्प्याटप्प्याने आंदोलनाची सुरुवात झाली आहे. आश्वासन पूर्ण होईपर्यंत आम्ही नियमानुसार पेट्रोलपंपांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवणार आहोत.

14 मेपासून सर्व पेट्रोलपंप रविवारी साप्ताहिक सुटी सुरू करणार आहेत. 15 मेपासून सकाळी 9 ते सायंकाळी 6 या एका शिफ्टमध्ये पेट्रोलपंप चालवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*