पेट्रोल, डिझेल 40 रुपये लिटर न केल्यास जनतेच्या भावनांचा भडका उडेल : ना. विखे

0
लोणी (वार्ताहर)- मै खाऊंगा.. अदानी-अंबानीको खिलाऊंगा और जनता को भुखा रखुंगा! ही नरेंद्र मोदींची कार्यपद्धती आहे. त्यातूनच पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरांमध्ये वाढ करून केंद्र सरकारने सामान्य ग्राहकांना संकटात टाकले आहे. सरकारच्या या धोरणांच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. भारत बंदचे आंदोलन ही फक्त सुरुवात आहे. पेट्रोल, डिझेल 40 रुपये लिटर करून सरकारने याबाबत दिलासादायक निर्णय घ्यावा. जनतेच्या भावनांचा भडका उडण्याची वाट पाहू नका, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ लोणी बुद्रुक येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या आंदोलनात ना. राधाकृष्ण विखे पाटील, अण्णासाहेब म्हस्के पाटील यांचाही सहभाग होता. आंदोलनकर्त्यांपुढे बोलताना ना. विखे पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकविरोधी धोरणांचा कडक शब्दांत समाचार घेऊन निषेध केला. ना. विखे पाटील म्हणाले, भाजप आणि शिवसेनेचे देशातील आणि राज्यातील सरकार हे जनतेला गृहीत धरून कारभार करीत आहे. याची किंमत त्यांना चुकवावी लागणार आहे. सत्तेवर येण्यापूर्वी या सरकारने पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करण्याचे आश्वासन दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅसची योजना पुढे आणली. मोठमोठ्या जाहिराती केल्या पण आज सिलेंडरच्या किमती वाढवून या देशातील महिलांचा त्यांनी अवमान केला आहे. सामान्य जनतेचा सरकारने केलेला विश्वासघातच असल्याचे त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत सुमारे 80 डॉलर्स प्रति बॅरल आहे. तरीही आज पेट्रोल डिझेलचे दर 88 आणि डिझेलचे दर 77 रुपये कसे? केंद्र सरकारने पेट्रोलियम पदार्थांवरील उत्पादन शुल्क कमी करावे, राज्य सरकारने मूल्यवर्धीत कर आणि अधिभारांमध्ये तात्काळ कपात करावी. भारत बंदचे आंदोलन हा केवळ केंद्र सरकारला सूचक इशारा आहे.
या आंदोलनाला समविचारी पक्ष संघटनांनी पाठिंबा दिल्यामुळे या आंदोलनाची तिव्रता अधिक वाढली आहे. सरकारच्या धोरणाविरोधात सामान्य माणसांच्या भावना तीव्र बनल्या आहेत. त्याचा भडका होणार नाही याची वाट पाहू नका. तातडीने दिलासादायक निर्णय घ्या, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलनाला सरकारला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी शेवटी आपल्या भाषणात दिला.

याप्रसंगी अण्णासाहेब म्हस्के यांचे भाषण झाले. ग्रामस्थांच्यावतीने प्रांताधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात विविध संस्थांच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शिवसेनेएवढा लाचार पक्ष नाही : ना.विखे
सत्तेसाठी शिवसेनेएवढा लाचार झालेला पक्ष मी आजपर्यंत पहिला नाही. खिशातले मंत्र्यांचे राजीनामे खिशाबाहेर आलेच नाहीत. 235 वेळा सरकारमधून बाहेर पडण्याची वलग्ना केली पण ती हवेतच विरली.उलट महामंडळांची अध्यक्षपदे घेऊन लाचारीचा कळस गाठला, अशा शब्दांत बंदमध्ये सहभागी न झालेल्या शिवसेनेचा ना. विखे यांनी समाचार घेतला.

LEAVE A REPLY

*