शासनाच्या विरोधात जनहित याचिका दाखल करणार

0

ताहाराबाद येथील शेतकर्‍यांच्या बैठकीत एकमुखी निर्णय

राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील 50 पैसे पेक्षा कमी पैसेेवारी असलेल्या गावांच्या शेतकर्‍यांची बैठक ताहाराबाद येथे पार पडली. कोणतेही कर्ज न भरण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला. शासनाने केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. तसेच शासनाच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा एकमुखी निर्णय करून ठराव करण्यात आला.
ताहाराबाद येथील महीपती महाराज मंदिर प्रांगणात शेतकर्‍यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत एकमुखी निर्णय घेण्यात आला. यावेळी शासनाच्या पत्रकाची होळी करण्यात आली.
राहुरी तालुक्याच्या पश्‍चिम भागातील वाबळेवाडी, वरशिंदे, ताहाराबाद, म्हैसगाव, कोळेवाडी, गाडकवाडी, चिंचाळे, गडधे आखाडा, तांभेरे, कनगर, कानडगाव, तुळापूर, निंभेरे या 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणार्‍या गावांच्या नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांनी  आपली कैफियत या बैठकीत मांडली.
राहुरी तालुक्यातील पश्‍चिमेकडील डोंगराळ भाग व कोरडवाहू परिसरातील 16 ते 17 गावे तीन वर्षांपासून 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारीत आहेत. त्यामुळे शेतीपासून मिळणारे उत्पन्न नगण्यच आहे. तरीही सलग पाच वर्षांपासून गावातील सहकारी सोसायटीचे कर्ज नवे-जुने करण्यासाठी व्याजाने पैसे घ्यावे लागले. नियमित कर्ज फेडणार्‍यांवरच अन्याय झाला आहे.
शासनाच्या या फसव्या कर्जमाफी घोषणेचा या भागातील शेतकर्‍यांना काडीमात्र फायदा झाला नसल्याने शेतकर्‍यांनी शासनाचा निषेध केला. शासनाच्या विरोधात खंडपीठात जनहित याचिका दाखल करून हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा ठराव करण्यात आला.
यावेळी राजाबापू वाबळे व फक्कड गागरे यांनी शासनाच्या कर्जमाफीचा समाचार घेताना नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांची क्रूर थट्टा केल्याचे सांगून शेतकर्‍यांनी कोणतेही कर्ज भरू नये असे आवाहन केले.
यावेळी मोहन वाबळे, विलास गागरे, अप्पासाहेब वाबळे, डॉ.संदीप मुसमाडे, संजय मुसमाडे, चांगदेव हारदे, ज्ञानदेव सिनारे, शांताराम नेहे, जगन्नाथ लोंढे, शरद उदावंत, सुनील झावरे, जयसिंग घाडगे, भाऊसाहेब गटकळ, गंगाधर काकडे, अण्णासाहेब घाडगे, दादा नालकर, ज्ञानदेव साबळे, संजय किनकर, दादा वाबळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*