Live Video देशदूत विशेष : पेठच्या आश्रमशाळेतील विद्यार्थी झाला आयएएस

0

नाशिक, (पंकज जोशी) ता.  २८ : जिथे उच्च शिक्षणासाठी चांगल्या मार्गदर्शक सहज उपलब्ध होत नाही अशा पेठ सारख्या दुर्गम आदिवासी भागातील आश्रमशाळेत जाणारा विद्यार्थी स्वयंप्रेरणा आणि कठोर मेहनतीने आयएएस झालाच शिवाय अशा हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा स्त्रोत बनला आहे.

हा संघर्षमय प्रवास आहे फणसपाडा, ता. पेठ येथील डॉ. योगेश तुकाराम भरसट यांचा. मे महिन्यात जाहीर झालेल्या भारतीय प्रशासकीय सेवा अर्थातच आएएस परीक्षेच्या निकालात त्यांनी देशात २१५ वे स्थान मिळवले आहे. तर आदिवासी प्रवर्गातून ते राज्यात पहिले आणि देशातून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून लवकच ते भारताच्या प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून दाखल होणार आहेत.

वडिल पंचायत समितीत शिपाई, तर आई अशिक्षित जवळच्या पाड्यावर शिक्षणाची नीट सोय नाही, अशा स्थितीत डॉ. योगेश यांनी दहावीपर्यंतचे सर्व शिक्षण आश्रमशाळेत घेतले. आश्रमशाळेत शिकताना अनंत अडचणी आल्या पण स्वावलंबन आणि स्वयंशिस्तही शिकायला मिळाली. त्यातून मला काय व्हायचे ते मी ठरवू शकलो. त्यातूनच पुढे मेहनत, चिकाटीच्या जोरावर एमबीबीएस आणि नंतर एमडी झालो असे अनुभव डॉ. योगेश यांनी सांगितले. डॉक्टर झाल्यानंतर मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात काही काळ वैद्यकिय प्रॅक्टीसच्या माध्यमातून रुग्णसेवा केली. डॉक्टर होऊन काही रुग्णांची सेवा करता येईल, पण सामान्यांचे सर्वच प्रश्न सोडविता येणार नाही. त्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतच गेले पाहिजे ही जाणीव झाल्यानंतर त्यांनी चार वर्षांपूर्वी युपीएससीसाठी तयारी केली. हा विचारच त्यांच्यासाठी ‘टर्निंग पॉईंट’ ठरला.

पुढे पहिल्याच प्रयत्नात ते आयआरएस झाले. त्यानंतर पुढे दोनदा आणि एकूण तीनदा ते आयआरएस सेवा उत्तीर्ण झाले. तथापि त्यांचे स्वप्न होते ते आयएएस व्हायचे. ते सांगतात की स्वत:वर जर दृढ विश्वास असेल तर आपण आपले लक्ष्य साध्य करू शकतो. मागच्या वर्षी मला निबंधात केवळ ७० गुण मिळाले. त्यामुळे मी आयआरएस झालो. पण पुढे मी अभ्यास वाढविला. चिकाटी कायम ठेवली आणि मागच्या वर्षी झालेल्या परीक्षेत निबंधात १४० गुण मिळवून आयएएसच्या स्वप्नाला गवसणी घालू शकलो.   मी वैद्यकीय शाखेचा विद्यार्थी असल्याने सुरवातीला अर्थशास्त्र, इतिहास, भुगोल असे विषय अवघड जायचे पण कुठलाही अहंकार न बाळगता युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मी ते समजावून घेतले. त्यातून यश मिळाले असेही त्यांनी सांगितले.

आपल्या आईवडिलांमुळेच आपण आज हे यश मिळवू शकलो. त्यामुळे सर्व श्रेय त्यांनाच द्यावे लागेल असे सांगताना वडिल शिपाई असल्याची सल मनात घेऊन वावरलो आणि आज शिपायाचा मुलगा आयएएस  झाला याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचेही डॉ. योगेश यांनी मोकळेपणे सांगितले. सोबतच प्रशासकीय सेवेसाठी आपल्याला माजी जिल्हाधिकारी बी.जी. वाघ यांचे अनमोल मार्गदर्शन लाभल्याचेही ते म्हणाले.  भविष्यात भारतीय प्रशासकीय सेवेचा जबाबदार अधिकारी म्हणून आदिवासी बांधवासाठी, सामान्य जनतेसाठी काम करण्याचा निर्धार डॉ. योगेश यांनी बोलून दाखविला.

स्वयंप्रेरणेचा प्रवास

जिथे धड रस्ते नाहीत अशा दुर्गम आदिवासी भागातला योगेश हा विद्यार्थी. त्यामुळे त्याचा आयएएस पर्यंतचा सर्व प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. डॉ. योगेश हा स्वयंप्रेरणेने घडलेला व्यक्ती आहे. आजपर्यंत त्याने सर्व यश हे स्वबळावर मिळविले आहे. त्याच्यातला हा गुण इतर तरुणांना प्रोत्साहन देणारा आहे.

  • बी. जी. वाघ, सेवानिवृत्त सनदी अधिकारी

LEAVE A REPLY

*