विकासामुळेच जनतेचा मोदींवर विश्वास – जावडेकर

0
नवीन नाशिक (प्रतिनिधी): मागील शासनाच्या काळात वर्षानुवर्षे राबविण्यात आलेल्या चुकीच्या योजना भाजपा शासन काळात बंद करण्यात आल्या. अवास्तव खर्च, नको असलेल्या शिष्यवृत्त्या आणि पेन्शन योजनांमधील भ्रष्टाचार बंद केल्यामुळे देशातील जनतेच्या पैशांची प्रचंड बचत झाली.

देशाच्या विकासाची प्रबळ इच्छाशक्ती आहे म्हणूनच भारतीय जनतेने भाजपावर आणि मोदींवर विश्‍वास व्यक्त केला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर येथे यशस्वी व्यावसायिकांशी संवाद साधताना केले.

औद्योगिक क्षेत्रात गेल्या तीन वर्षात झालेली प्रगती मागच्या पंधरा-वीस वर्षात झालेल्या कामांपेक्षा अधिक आहे. उद्योगांना प्राधान्य दिल्यामुळे रोजगार निर्मिती झाली व त्याचे चांगले परिणाम विकास दराच्या वृद्धीतून दिसू लागले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रचलित पद्धतींमध्ये थोडे-थोडे बदल घडविल्यानेही विकासाची गती साधता येते हे भाजपाच्या शासन काळात अधोरेखित झाल्याचे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले.
या संवाद सत्रावेळी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी उपस्थित होते. तर उपमहापौर प्रथमेश गीते,आ.देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, माजी आमदार वसंत गिते, लक्ष्मण सावजी, विजय साने, सुहास फरांदे आदींसह आयमाचे पदाधिकारी धनंजय बेळे, राजेंद्र आहिरे, निखिल पांचाळ, दिलीप राजपूत, मंगेश पाटणकर, संजय महाजन, आशिष नहार, प्रदीप पेशकार, शिवाजी गांगुर्डे आदी प्रेक्षागारात उपस्थित होते.

यजमान कोण हेच कळेना

केंद्रीय मंत्री यशस्वी उद्योजकांशी संवाद साधण्यासाठी नियोजित वेळेवर उपस्थित झाले तरी संवादसत्राचे आयोजक उपस्थित नव्हते. मंत्रीमहोदय व्यासपीठावर विराजमान झाले व त्यांनीच कार्यक्रमाला सुरुवात केल्याने कार्यक्रमाचे यजमान कोण ? असा प्रश्न उपस्थितांना पडला. तर ज्या उद्योजकांशी संवाद केला जाणार होता त्यांचीही उपस्थिती नगण्य असल्याने मंत्रीमहोदयांनीही थोडक्यात मनोगत व्यक्त करून पुढील कार्यक्रमासाठी प्रस्थान केले.

उद्योजकांनीच या संवाद सत्राकडे पाठ फिरवल्याने या संदर्भात ना.जावडेकरांनी आयमच्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केल्याचेही समजते.

आमदार देवयानी फरांदे व आमदार सीमा हिरे यांचेही आगमन उशिरा झाल्याने त्यांना व्यासपीठाऐवजी प्रेक्षागारात स्थानापन्न व्हावे लागले.

LEAVE A REPLY

*