पेन्शनच्या न्याय हक्कासाठी संघटित व्हा

0

पोखरकर : राज्य पेन्शनर्स संघटनेचा मेळावा

शिरसगाव (वार्ताहर) – आपल्या प्रत्येकाच्या पगारातून दरमहा पेन्शन फंडासाठी रक्कम कपात करून ती केंद्र शासनाच्या भविष्यनिर्वाह निधीमध्ये जमा होते. सेवानिवृत्त होतो, त्यावेळी प्रत्येकाचे 30-32 वर्षांमध्ये लाखो रुपये जमा होतात.
अशा जमा रकमेच्या फक्त व्याजाच्या रकमेतून अतिशय तुटपुंजे वेतन पेन्शनधारकांना देऊन केंद्र शासन पेन्शनधारकांची मोठी लूट करीत आहे. त्यासाठी सर्वांनी संघटित होऊन मोठा लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष पोखरकर यांनी आश्‍वी अमरेश्‍वर मंदिर येथे झालेल्या मेळाव्यात केले.
पोखरकर म्हणाले, आज देशात 54 लाख अल्प पेन्शनधारक असून त्यांच्या जमा रकमेवर प्रचंड व्याज केंद्र सरकार जमा करते, व्याजातून अल्पशी रक्कम पेन्शनधारकांना मिळते. सन 2013-14 मध्ये सरकारला फक्त व्याज 16657 कोटी रुपये मिळाले.
परंतु पेन्शनधारकांना 5728 कोटी वाटले. 2014-15 मध्ये सरकारला 19097 कोटी व्याज मिळाले व वाटले फक्त 8400 कोटी. म्हणजे आपल्याच रकमेची सरकार कशी पळवापळवी करते याचा विचार करा. फक्त व्याजातून जरी सरकारने खा. भगतसिंह कोशियारी यांनी शिफारशी केल्यानुसार दरमहा तीन हजारांहून अधिक महागाई भत्ता दिला तरी सरकारला कोणतीच अडचण नाही.
याच सरकारमधील ना. प्रकाश जावडेकर यांनी जंतरमंतरवर धरणे आंदोलन प्रसंगी आमचे सरकार येऊ द्या, 90 दिवसांत तुमची मागणी मान्य करतो, असे आश्‍वासन दिले जे हवेतच विरले. या तीन वर्षात दिल्ली येथे विविध आंदोलने केली. पण कोणतीच अंमलबजावणी नाही.
देशातील विविध हायकोर्टात संघटनांनी याचिका दाखल केल्या तर त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी नाही. तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून या देशातल्या या पेन्शनधारकांची सोशल मीडिया, वृत्तपत्राद्वारे दिशाभूल करून पेन्शनधारकाकडूनच लाखो रुपये गोळा करण्याचा घाट शासन घालीत आहे.हा इपीएस 95 च्या पेन्शनधारकांवर अन्याय आहे.
त्यासाठी पुढील काळात जागृत होण्याची आवश्यकता आहे. महराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना त्यासाठी राज्यव्यापी मेळावा शिर्डी येथे आयोजित करण्यात येत असून मेळाव्यास देश व राज्यातील संघटनेचे प्रतिनिधींना निमंत्रित करणार आहोत. या मेळाव्यास यशवंत वर्पे, अच्युतराव सांगळे, नारायण वाणी, रामराव गांजवे, बाबूराव गेठे, उंबरकर, सुकदेव आहेर, सुभाष तांबे, भुसाल, मनतोडे, भोसले व परिसरातील पेन्शनधारक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*