Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

निधी मिळूनही शिवरस्त्याचे काम नाही; वडांगळीचे ग्रामस्थ उपोषणाला बसणार

Share

सिन्नर | वार्ताहर

वडांगळी-तामसवाडी खराब शिवरस्त्याच्या सुधारणेसाठी वर्षभरापूर्वी उपोषण करून पालकमंत्री पाणंद योजनेत निधी मिळवून आणण्यात येथील शेतकऱ्यांना यश मिळाले. मात्र सिन्नर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी या रस्त्यास प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश न देता निधी माघारी पाठविल्याचा आरोप करत वडांगळी येथील शेतकऱ्यांनी सोमवारपासून पुन्हा एकदा उपोषणास बसण्याचा इशारा आहे.

वडांगळी तामसवाडी शिवरस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यात तर ह्या रस्त्याने प्रवास करणे शक्य होत नाही. विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. शेतकऱ्यांनाही मोठमोठ्या खड्ड्यातून साधारणपणे दीड किलोमीटरची पायपीट करावी लागते. आपली वाहने तामसवाडी रस्त्याच्या कडेला उभी करून शेतकरी चिखल तुडवत आपल्या शेतात जातात. शेतावर राहणाऱ्या शेतकऱ्यांचा तर गावाशी संपर्क तुटतो. एखादी व्यक्ती आजारी पडली तर दवाखान्यात घेऊन जाणेही अवघड होऊन जाते. या त्रासाला वैतागून रस्त्याच्या मागणीसाठी मागील वर्षी या भागातील शेतकरी उपोषणास बसले होते. तत्कालीन नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांनी उपोषणकार्त्यांशी मध्यस्थी करत हा रस्ता मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

शेतकरी व माजी सरपंच शिवाजी खुळे यांनी पालकमंत्री पानंद योजनेतुन रस्त्याच्या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. वडांगळीसह तालुक्यातील १० पानंद रस्त्यांना निधी मंजूर झाला. तहसीलदार सिन्नर यांच्याकडे निधी आल्यानंतर त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना या रस्त्यांना प्रशासकीय मंजुरी व कार्यारंभ आदेश देण्यासाठी सांगितले. मात्र मार्च २०१९ अखेर निधी खर्च होऊ शकत नसल्याचे कारण देत गटविकास अधिकाऱ्यांनी निधी परत पाठविल्याने या रस्त्यांच्या मंजुरीबाबत शेतकऱ्यांच्या मनात शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे उपोषण करून मिळविलेल्या रस्ता परत गेल्याने तो परत आणण्यासाठी सोमवार दि.१ जुलै पासून येथील शेतकरी पुन्हा बंगाली बाबा परिसरात सकाळी ११ वाजेपासून उपोषणास बसणार आहे.

निधी परत पाठवायला नको होता..
मंजूर झालेला निधी मार्च अखेर खर्च न झाल्याने तो परत पाठवल्याचे प्रशासन सांगत आहे तर शेतकऱ्यांचा दावा आहे की, मंजूर झालेला निधी पुढील आर्थिक वर्षाअखेर वापरता येत असल्याने प्रशासनाने तो परत जाऊच द्यायला नको होता. आता सगळ्या प्रक्रिया पुन्हा करण्याऐवजी आहे त्याच कामाला मंजुरी देऊन प्रशासनाने परत गेलेला निधी पुन्हा आणेपर्यंत उपोषण सुरू राहील, असा इशारा उपोषण कर्त्यांनी दिला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!